अतिक्रमण हटविण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

By Admin | Updated: July 1, 2015 23:40 IST2015-07-01T23:40:45+5:302015-07-01T23:40:45+5:30

मंदिर परिसर व शहरातील प्रमुख पालखी प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम गेल्या तीन दिवसांपासून राबवण्यात येत आहे.

Opposition to trade against encroachment | अतिक्रमण हटविण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

अतिक्रमण हटविण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

आळंदी : मंदिर परिसर व शहरातील प्रमुख पालखी प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम गेल्या तीन दिवसांपासून राबवण्यात येत आहे. मात्र, प्रथम शहरातील मोठ्या प्रमाणात असलेली अनधिकृत बांधकामे हटवा व मगच आमची दुकाने हटवा, असा पवित्रा घेत मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे पुढील कार्यवाहीला ब्रेक द्यावा लागला.
येथील नगर प्रदक्षिणा मार्गावरील पालिकेने बांधलेले मिनी व्यापारी संकुल पाडल्याने प्रदक्षिणा रस्त्याने मोकळा श्वास घेतला असल्याने याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, शहरातील अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांच्या दुकानापुढील वाढलेले पत्र्याचे शेड, ओटा याबाबी तशाच दिसून येत आहेत, तर काहींनी समंजसपणे हे अतिक्रमण काढून घेत न.प. च्या कार्यवाहीला प्रतिसाद दिला.
दरम्यान, बुधवारी सकाळी मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे शेड पाडण्यासाठी अतिक्रमणविरोधी पथक दाखल होताच एकत्र येऊन विरोध दर्शविला. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या दुकानाचे भाडे सर्व करासहीत भरत आहोत. मग आम्ही अतिक्रमण केले कसे म्हणता येईल, आम्ही भाडेकरू आहोत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार व हा परिसर आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात येत असल्यामुळे आम्हा बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी अगोदर मंदिर परिसरातील अन्य पर्यायी जागेत पुनर्वसन करा व मगच आमच्या दुकानाचे शेड तोडा, असा खंबीर पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला.
शहरातील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामावर कसलीच कार्यवाही न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रथम ही अनधिकृत बांधकामे तोडावीत, मगच आमच्या लहान व्यापाऱ्यांची दुकाने तोडावीत व याकामी त्यांनी प्रत्यक्ष कार्यवाहीत भाग घेऊन आपली धडक मोहीम यशस्वी करून दाखवावी, अशीही मागणी काही व्यापाऱ्यांनी केली. या वेळी संतापलेल्या व्यापाऱ्यांनी बुलडोझरसमोर चक्क आडवे होण्याची तयारी ठेवून बुलडोझरपुढे बसून राहिल्याने कार्यवाहीत अडथळा निर्माण झाला.
मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविणाऱ्या व्यापाऱ्यांशी त्यांची भेट होऊ शकली नाही; कारण विभागीय आयुक्तांच्या दौऱ्याची तयारी करीत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन पथकाने दिवसभराची कार्यवाही स्थगित केली.

शहरातील पालिकेच्या जागा प्रथम मोकळ्या करण्यासाठी आम्ही हे अतिक्रमण काढून टाकण्याची मोहीम राबवत आहोत. सद्य:स्थितीत मंदिर परिसर मोकळा करण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याने ही कार्यवाही करणे आवश्यक आहे. जेव्हा पालिकेकडे तशी पर्यायी जागा उपलब्ध होईल तेव्हा मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन शक्य आहे.
- विनायक औंधकर, मुख्याधिकारी.

शहरातील अनेक अनधिकृत बांधकामे पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही ती का पाडली जात नाहीत, त्याचे अगोदर उत्तर द्या.
- नंदकुमार कुऱ्हाडे

Web Title: Opposition to trade against encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.