रिंगरोडला मुळशीतील जमिनी देण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:13+5:302021-02-05T05:06:13+5:30
घोटवडे: भोर-हवेली-मुळशी मावळ या भागांतून जाणाऱ्या रिंगरोडला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. रिहे येथे ३०० शेतकरी एकत्र येत ...

रिंगरोडला मुळशीतील जमिनी देण्यास विरोध
घोटवडे: भोर-हवेली-मुळशी मावळ या भागांतून जाणाऱ्या रिंगरोडला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. रिहे येथे ३०० शेतकरी एकत्र येत त्यांनी या मार्गाला विरोध दर्शवला.
मुळशी तालुक्यातून जाणाऱ्या तसेच यामुळे बाधित गावांचे सर्वे क्रमांकाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, जमिनी आरक्षित करताना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सूचना अथवा नोटीस दिलेली नाही. त्यामुळे शेतकरी एकत्र येऊन शासनाच्या विरोधात त्यांनी निर्णय घेत जमिनी देण्यास विरोध केला आहे.
येथील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती हीच आहे. काहींच्या सर्व जमिनी या प्रकल्पात जात आहे. त्यामुळे ते भूमिहीन होण्याची शक्यता आहे. हा मार्ग बंदिस्त आहे तसेच तो येथील ओढ्यातून जात असल्याने नैसर्गिक जलमार्गात अडथळा होऊन येथील घरे व जमिनीला धोका निर्माण होणार आहे. प्रत्येक गावातील वन जमिनी व खासगी जमिनीत वनीकरण झाले आहे. जंगलातील प्राण्यांना नदी ओढ्यावर यावे लागते मात्र, या मार्गामुळे तो बंद होणार असल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे. तसेच पाणी नसल्याने बागायती जमिनींवर परिणाम होणार आहे.
चौकट
हरकत नोंदवायला मिळणार कमी वेळ
शासनाने ४ जानेवारीला परिपत्रक काढले व १० दिवसांनी हरकत नोंदीची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली. त्यामुळे शेतकऱ्यांना हरकत नोंदविण्यास कमी वेळ मिळाला. शासनाने शेतकऱ्यांची संमती गृहीत धरली आहे. नोंदी करताना शेतजमिनीत फळझाडे व गोठे घरे पोल्ट्री शेड याची नोंद ७/१२उताऱ्यावर नाही. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने या प्रस्तावित रिंगरोडला शेतकरी विरोध करत आहेत. यावेळी राजेंद्र चोरघे व जलीधर दळवी यांनी मार्गदर्शन केले व माणिक शिंदे, आंनद घोगरे, अनिल मोरे, कमलाकर शिंदे, बबन शिंदे, शशिकांत ढमाले, संतोष घारे, केमसे यांनी सदर कार्यक्रमात रिंगरोडला विरोध केला.