बावधन प्रकल्पाला विरोध
By Admin | Updated: February 3, 2015 01:02 IST2015-02-03T01:02:04+5:302015-02-03T01:02:04+5:30
बावधन भागातील लोकवस्तीत नियोजित असलेल्या कचरा वर्गीकरण शेड्सच्या कामासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध वाढला आहे.

बावधन प्रकल्पाला विरोध
कोथरूड : बावधन भागातील लोकवस्तीत नियोजित असलेल्या कचरा वर्गीकरण शेड्सच्या कामासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध वाढला आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी अॅमेनिटी स्पेस समितीची परवानगी घेण्यात न आल्याने हे काम बंद करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका पुष्पा कनोजिया यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. स्थानिक नागरिकांनी या विरोधात सह्यांची मोहीम राबविली असून, महापालिका आयुक्तांना निवेदनही देण्यात आले आहे.
बावधन भागातील मराठा मंदिर भागातील पुणे महापालिकेच्या रिकाम्या जागेवर कचरा वर्गीकरण करण्यासाठी पुणे महापालिकेच्या कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने घनकचरा विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु, दरम्यानच्या काळातच अॅमेनिटी स्पेस समितीच्या वतीने या जागेलगतच बायोगॅस प्रकल्प असल्याने जागेच्या वापरात बदल करण्यास परवानगी दिलेली आहे. या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार, पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात २० लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सध्या या जागेवर खासदार प्रकाश जावडेकर यांच्या निधीतून १८ लाखांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम अॅमेनिटी स्पेस कमिटीची परवानगी न घेतल्याने बंद करण्यात आले आहे. मराठा मंदिर परिसरातच पुणे महापालिकेचा ५ टन क्षमतेचा ओला कचरा प्रकल्प असतानाही नव्याने कचरा वर्गीकरण प्रकल्प झाल्यास स्थानिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या वतीने अन्य प्रभागांत संबंधित प्रकल्प स्थलांतरित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
४याबाबत पुणे महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश सकपाळ यांनी संबंधित काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून, याबाबत स्थानिकांच्या भावनेचा विचार करून काम बंद केले असल्याचे सांगितले. मात्र, पुणे महापालिकेने कचरा वर्गीकरण प्रकल्प बंद न केल्यास पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा प्रशांत कनोजिया यांनी दिला आहे.