प्रक्रियेबाहेरील विद्यार्थ्यांनाही संधी
By Admin | Updated: June 30, 2015 23:27 IST2015-06-30T23:27:33+5:302015-06-30T23:27:33+5:30
प्रवेश यादीत स्थान मिळूनही काही कारणास्तव ५० रुपये शुल्क भरून प्रवेश न घेऊ शकलेले विद्यार्थी, आॅनलाईन अर्ज भरूनही तो सबमीट न केलेले विद्यार्थी

प्रक्रियेबाहेरील विद्यार्थ्यांनाही संधी
पिंपरी : प्रवेश यादीत स्थान मिळूनही काही कारणास्तव ५० रुपये शुल्क भरून प्रवेश न घेऊ शकलेले विद्यार्थी, आॅनलाईन अर्ज भरूनही तो सबमीट न केलेले विद्यार्थी तसेच काही कारणास्तव या प्रक्रियेत आॅनलाईन अर्ज न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी दिली जाणार आहे. सध्या सुरू असलेली प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही.
इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत सध्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत सुमारे ६८ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका घेतली होती. तसेच ६८ हजार विद्यार्थ्यांपैकी पहिल्या प्रवेश फेरीत सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार महाविद्यालय देण्यात आले. त्यांपैकी केवळ ४२ हजार विद्यार्थ्यांनी ५० रुपये शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित केला.
त्यामुळे सुमारे १३ हजार विद्यार्थी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले. तसेच, अनेक विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे आॅनलाईन अर्ज करता आला नाही. काही विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्जातील केवळ पहिला भाग भरला. काहींनी दोन्ही भाग भरले; मात्र हा अर्ज ते सबमीट करू शकले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी आॅनलाईन प्रक्रियेत येऊ शकले नाही. या तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीने त्यांच्यासाठी स्वतंत्र आॅनलाईन प्रवेश राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना प्रवेश समितीचे अध्यक्ष व विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव म्हणाले, ‘‘विविध कारणांमुळे आॅनलाईन प्रक्रियेतून बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी स्वतंत्र आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाईल. त्यांच्या विविध तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ही प्रक्रिया सध्या सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेतील
तिसरी फेरी पूर्ण झाल्यानंतर राबविण्यात येईल. तिसऱ्या
फेरीनंतर रिक्त राहणाऱ्या जागांवरच हे प्रवेश दिले जातील. त्याबाबतचे वेळापत्रक व नियमावली प्रवेश समितीच्या बैठकीनंंतर जाहीर केली जाईल.’’ (प्रतिनिधी)