मोदी लाटेचा विरोधकांनी घेतला धसका
By Admin | Updated: June 9, 2014 04:54 IST2014-06-09T04:54:51+5:302014-06-09T04:54:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेने सत्ताधारी पक्षातील इच्छुक धास्तावले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना १६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते

मोदी लाटेचा विरोधकांनी घेतला धसका
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेने सत्ताधारी पक्षातील इच्छुक धास्तावले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना १६ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले भाजपाचे खासदार अनिल शिरोळे यांना या मतदार संघातून चौपट मताधिक्य मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा पर्वती मतदार संघातील विरोधकांनी धसका घेतला आहे.
राष्ट्रवादीतील इच्छुक चिडीचूप आहेत, तर काँग्रेस पुन्हा पर्वती मतदार संघ मागण्याच्या तयारीत आहे. थेट राज ठाकरे विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याने मनसेतून इच्छुकांची भाऊगर्दी आहे.
पर्वती विधानसभा मतदार संघात विविध जाती-धर्माचे, तसेच, सर्व अर्थिक स्तरातील लोकसंख्या आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक असल्याने हा मतदार संघ अनेक वर्षे राखीव होता. त्यामुळे पर्वती हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.
मात्र, २००९ च्या विधानसभा मतदार संघाच्या फेररचनेत पर्वतीचा काही भाग कॅन्टोन्मेंट मतदार संघाला जोडण्यात आला. त्यामुळे पर्वती मतदार संघ खुला होवून कॅन्टोन्मेंट राखीव झाला. त्यानंतर पर्वतीतून काँग्रेसचे दिग्गज उमेदवार इच्छुक असताना पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी हा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडला. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवार शोधण्यापासूनच धावपळ झाली. राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण यांचे नाव चर्चेत असताना युवक अध्यक्ष सचिन तावरे
यांना संधी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील इच्छुकांची नाराजी व बंडखोरी निवडणुकीतही दिसून आली. भाजपाने अगोदरपासून तयारी सुरू केल्याने २००९ च्या निवडणुकीत आमदार माधुरी मिसाळ यांनी मताधिक्याने तावरे यांचा पराभव केला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदार संघातून पुन्हा मिसाळ यांच्याबरोबर ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले हेही इच्छुक आहेत.
बहुभाषिक, जाती-धर्मांच्या या मतदार संघात २०१२ च्या महापालिका निवडणुकीत भाजप व सेना युतीचे सर्वाधिक १०, काँग्रेस आघाडीचे ५ आणि मनसेचे एक नगरसेवक आहेत. गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादीचे सभागृहनेते सुभाष जगताप यांनी पर्वतीतून लढण्याची तयारी सुरू
केली आहे.
तसेच, सचिन तावरे पुन्हा लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत पर्वती मतदार संघातून भाजपाचे शिरोळे यांना ६८ हजाराचे विक्रमी मतदान मिळाले आहे. या निकालाचा राष्ट्रवादीतील दोन्ही इच्छुकांनी धसका घेतला आहे. (प्रतिनिधी)