मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा सपाटा : हर्षवर्धन पाटील
By Admin | Updated: February 17, 2017 04:28 IST2017-02-17T04:28:57+5:302017-02-17T04:28:57+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर इंदापूर तालुक्यात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा पाहावयास मिळेल. तालुक्यात

मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा सपाटा : हर्षवर्धन पाटील
बावडा : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर इंदापूर तालुक्यात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा पाहावयास मिळेल. तालुक्यात मागील दोन अडीच वर्षांत नवीन विकासाचे कोणतेही काम झाले नाही. अगोदर मंजूर झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा विरोधकांनी सपाटा लावला आहे,’ अशी टीका काँग्रेसचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित वरकुटे बुद्रुक येथील सभेत पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची कामे झाली. दिवंगत नेते शंकरराव पाटील, राजेंद्रकुमार घोलप आदींनी शेतकरी आणि सामान्य जनतेच्या विकासाला महत्त्व दिले. कर्मयोगी कारखाना, नीरा, भीमा कारखान्यामुळे विकासाला गती आली. या कारखान्यांच्या माध्यमातून अधिकचा दर कसा दिला जाईल, याचाच विचार केला जातो. काँग्रेस आघाडीच्या काळात जी विकास कामे मंजूर करण्यात आली, तीच कामे भाजपा सरकारच्या काळात तालुक्यात सुरू आहे.
मात्र, त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे आमदार घेतात. नव्याने एकही विकासकाम हाती घेता आले नाही, अशीही टीका त्यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते. (वार्ताहर)