नवी दिल्ली : आमच्या काळात गावांमध्ये खेळांसाठी उत्कृष्ट सुविधा नव्हत्या आणि आताही पॅरा खेळाडूंसाठी उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळेच शहरांबरोबरच ग्रामीण भागातही क्रीडा अकादमी सुरू होणे गरजेचे आहे, असे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी म्हटले आहे.
जर्मनीत १९७२ मध्ये झालेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर ५२ वर्षांनंतर पेटकर यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि तीन विश्वविक्रमांची नोंद केली. या कामगिरीसह ते पॅरालिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारे भारताचे पहिले खेळाडू ठरले होते.
महाराष्ट्रात १९४४ मध्ये जन्मलेल्या पेटकर यांनी सांगितले, हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. पण गावांमध्ये आताही शहरांप्रमाणे खेळांसाठी गरजेच्या सुविधा मिळत नाहीत. त्यात पॅरा खेळाडूंचा विशेष उल्लेख करावा लागेल. माझ्या काळात गावांमध्ये सुविधा नव्हत्या. आताही ज्या क्रीडा अकादमी बांधल्या जात आहेत त्या शहरांमध्ये बांधल्या जात आहेत. गावांमध्येही अकादमी बांधा. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की अशा उत्कृष्ट सुविधा गावांमध्येही असायला हव्यात.
...म्हणून खेळाडूंकडून जागतिक विक्रम
पूर्वी, जर प्रशिक्षक चांगला असेल तर खेळाडू चांगला नसायचा. जर खेळाडू चांगला असेल तर प्रशिक्षक चांगला नव्हता. पण आता प्रशिक्षक आणि खेळाडू दोघेही चांगले आहेत. सर्वजण सुशिक्षित आहेत, मोठमोठी स्टेडियम आहेत, जिथे चांगल्या प्रशिक्षकाची आवश्यकता आहे, तिथे चांगला प्रशिक्षक दिला जातो, म्हणूनच मुले जागतिक विक्रम करत आहेत, असेही पेटकर म्हणाले.