कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचे तीन ते साडेचार टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:20 AM2021-05-05T04:20:19+5:302021-05-05T04:20:19+5:30

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : कोरोना होऊन गेल्यावर रुग्णाच्या शरीरात आयजीजी नावाच्या अँटिबॉडी तयार होतात आणि त्या तीन महिने ते ...

Only three to four-and-a-half percent of relapses occur in corona-free patients | कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचे तीन ते साडेचार टक्केच

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचे तीन ते साडेचार टक्केच

googlenewsNext

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोना होऊन गेल्यावर रुग्णाच्या शरीरात आयजीजी नावाच्या अँटिबॉडी तयार होतात आणि त्या तीन महिने ते एक वर्षापर्यंत टिकू शकतात. याशिवाय, ई-सेल, टी-सेल्स आणि मेमरी सेल्सही महत्त्वाची भूमिका बजावतात. अँटिबॉडीच्या पातळीवर संरक्षणाचे प्रमाण ठरते. जगभरातील अभ्यासानुसार कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तीन ते साडेचार टक्के इतके आहे.

शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ही आकडेवारी दिलासादायक ठरत आहे. मात्र, कोरोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत प्लाझ्मादान करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत नाही. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये अँटिबॉडी तयार होत असल्याने त्यांनी २८ दिवसांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

----

लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये कमी अँटिबॉडी तयार होतात आणि गंभीर रुग्णांमध्ये जास्त अँटिबॉडी तयार होतात, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांच्या तुलनेत जास्त अँटिबॉडी तयार होऊ शकतात. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये अँटिबॉडी साधारण सहा महिने टिकत असल्याने पुन्हा संसर्ग होण्याची शक्‍यता ९५ टक्‍क्‍यांनी कमी होते. शरीरात विषाणू नसतात, तेव्हा अँटिबॉडी ऍक्टिव्ह नसतात. शरीरातील ई-सेलवरही प्रोटेकटिव्ह रिस्पॉन्स अवलंबून असतो. आपल्या शरीरात अँटिबॉडीची पातळी किती आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. साडेचारपेक्षा कमी रेंज असेल तर अँटिबॉडीचे प्रमाण कमी, साडेचार ते साडेअठरा दरम्यान रेंज असल्यास मध्यम स्वरूपाच्या आणि साडेअठरापेक्षा जास्त असल्यास जास्त प्रमाणात अँटिबॉडी आहेत, असे मानले जाते.

- डॉ अमित द्रविड, संसर्गजन्यरोगतज्ज्ञ, नोबेल हॉस्पिटल

------

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये तयार झालेल्या अँटिबॉडी तीन ते चार महिने टिकतात. त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यताही कमी होते. प्रत्येक व्यक्तीचे शरीर विषाणूला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असते. अँटिबॉडी मोजणे हा इम्युनिटीचा एक प्रकार आहे. याशिवाय शरीरात तयार झालेले ई-सेल, टी-सेल हेही महत्त्वाची भूमिका बजावतात. कोरोना झाल्यानंतर शरीरात मेमरी सेल निर्माण होतात. कोरोना होऊन गेल्यावर ते ऍक्टिव्हेट होतात. पुन्हा या प्रकारचा विषाणू शरीरात शिरल्यास त्या त्वरित विषाणूला ओळखतात आणि त्यामुळे आजार गंभीर होत नाही. जगभरातील अभ्यासानुसार पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तीन ते साडेचार टक्के इतकेच आहे.

- डॉ. प्रदीप आवटे, राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी

------

कोरोनामुक्त रुग्णांना लसीचा एक डोस पुरेसा?

सायन्स इम्युनोलॉजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीच्या संशोधनात ज्यांना कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना कोरोनाचा कोणत्याही लसींचा एक डोस पुरेसा आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनामध्ये कोरोनामुक्त रुग्णांमधील अँटिबॉडीची पातळी तपासण्यात आली. सामान्य नागरिकांना लसीचे दोन डोस दिल्यानंतर जितक्या अँटिबॉडी तयार होतात, त्याच्या दहापट अँटिबॉडी कोरोनामुक्त रुग्णांना एक डोस दिल्यावर तयार झाल्याचे लक्षात आले. मात्र, एका संशोधनाच्या निष्कर्षावरून भारतातील लसीकरण कार्यक्रमांमध्ये बदल करणे शक्य नाही. शिवाय दुसरा डोस घेतल्यानंतर शरीराला तोटा काहीच होत नाही, असे डॉ. द्रविड यांनी सांगितले.

डॉ. आवटे म्हणाले, सध्या जगभरात कोरोनाशी संबंधित वेगवेगळे संशोधने आणि अभ्यास प्रसिद्ध होत आहेत. कोरोना विषाणूशी आपली झालेली ओळख केवळ एक वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे विविध प्रकारे अभ्यास आणि संशोधने करणे आवश्यक आहे. मात्र एखादे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर त्या क्षेत्रातील इतर तज्ज्ञ लोकांचा अभिप्रायही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे एखादे संशोधन झाले की लगेच धोरणात्मक निर्णयात बदल होतात, असे नाही, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.

Web Title: Only three to four-and-a-half percent of relapses occur in corona-free patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.