आंबेगाव तालुक्यात एकच जल्लोष,दिलीप वळसे पाटील गृहमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST2021-04-06T04:11:17+5:302021-04-06T04:11:17+5:30
मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला.निरगुडसर येथे फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री अनिल ...

आंबेगाव तालुक्यात एकच जल्लोष,दिलीप वळसे पाटील गृहमंत्री
मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला.निरगुडसर येथे फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटील यांचे नाव पुढे आले. वृत्तवाहिन्यांवरील बातम्यामध्ये वळसे पाटील हेच प्रमुख दावेदार असल्याचे सांगितले जात होते.त्यामुळे समाज माध्यमातून वळसे पाटील यांचे अभिनंदन करणारे संदेश फिरू लागले. तालुक्यातील जनतेच्या नजरा दूरचित्रवाणीकडे लागल्या होत्या. सायंकाळी वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी दिल्याची घोषणा झाली. आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
राज्य सरकारमध्ये वळसे पाटील कामगार व उत्पादन शुल्कमंत्री या खात्याचे काम समर्थपणे पाहत होते. त्यांनी याआधी ऊर्जा,उच्च व तंत्र शिक्षण,विधानसभेचे अध्यक्षपद यासारखी महत्त्वाची पदे समर्थपणे संभाळली आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निष्कलंक व अभ्यासू मंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे.त्यामुळे अशा अडचणीच्या काळात अनुभवी अशा नेत्याकडे गृहमंत्रिपद द्यावे अशी चर्चा राष्ट्रवादीत रंगली होती.
दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत,संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात.दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आत्तापर्यंतच्या राजकारणात त्यांच्यावर एकही आरोप झालेला नाही.त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ही जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील अशी खात्री अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची गृहमंत्रीपदासाठी घोषणा होताच मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा केला. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत कार्यकर्ते एकत्र जमले होते.यावेळी घोषणा देण्यात आल्या.माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले,मंचरचे उपसरपंच युवराज बाणखेले,जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस मंचरचे अध्यक्ष सुहास बाणखेले,ग्रामपंचायत सदस्य माणिक गावडे, ज्योती निघोट,कविता थोरात,दत्ता थोरात,संजय बाणखेले, राजेंद्र थोरात आदींनी जल्लोष करून एकमेकांना लाडू भरवून या निर्णयाचे स्वागत केले.वळसे पाटील यांच्या निरगुडसर या गावी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
गृहमंत्री पदाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आल्यानंतर मंचर शहरात एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा करण्यात आला.