फक्त चार ग्रामपंचायतींचा विकास आराखडा मंजूर

By Admin | Updated: May 18, 2015 23:12 IST2015-05-18T23:12:02+5:302015-05-18T23:12:02+5:30

बारामती तालुक्यात प्रादेशिक विकास आराखडा नसलेल्या ग्रामपंचायतींचे बांधकामाबाबतचे अधिकार गोठवून ते नगररचना विभागाला देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे संमिश्र स्वागत करण्यात येत आहेत.

Only four gram panchayats development plan approved | फक्त चार ग्रामपंचायतींचा विकास आराखडा मंजूर

फक्त चार ग्रामपंचायतींचा विकास आराखडा मंजूर

बारामती : बारामती तालुक्यात प्रादेशिक विकास आराखडा नसलेल्या ग्रामपंचायतींचे बांधकामाबाबतचे अधिकार गोठवून ते नगररचना विभागाला देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे संमिश्र स्वागत करण्यात येत आहेत. कामाचा ताण हलका होण्याची सरकारी अधिकाऱ्यांची, पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रि या आहे, तर यामुळे तालुक्यातील ग्रामस्थांना आपल्या कामासाठी नगररचनाकारांकडे खेटे घालावे लागतील, असा काहींचा सूर आहे.
ज्या ग्रामपंचायतींना सद्यस्थितीत विकास आराखडे नाहीत तेथील गावठाणाच्या हद्दीत नवीन बांधकाम परवाने देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना आहेत. मात्र त्यांना गावठाणाबाहेर बांधकामांना परवानगी देता येत नाही. मात्र ग्रामपंचायतींकडे तांत्रिक अधिकारी नाही म्हणून हे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. बारामती तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींपैकी फक्त चार ग्रामपंचायतींचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यात माळेगाव, वडगाव निंबाळकर, सांगवी आणि सुपे यांचा समावेश आहे.
या चार ग्रामपंचायतीवगळता ९३ ग्रामपंचायतींचा प्रादेशिक विकास आराखडा तयार नसल्याने तेथील बांधकामांसाठी या नगररचना अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी ग्रामस्थांना यावे लागणार आहे. यात अंजनगाव, आंबी खुर्द, आंबी बु., बऱ्हाणपूर, बाबुर्डी, भोंंडवेवाडी, चांदगुडेवाडी, चोपडज, चौधरवाडी, डोर्लेवाडी, ढाकाळे, ढेकळेवाडी, देऊळगाव रसाळ, दंडवाडी, धुमाळवाडी, गरदरवाडी, गुनवडी, गोजुबावी, गाडीखेल, होळ, जळगाव कप, जळगाव सुपे, जराडवाडी, जोगवडी, जैनकवाडी, कऱ्हा वागज, कटफळ, कन्हेरी, करंजेपूल, करंजे, काळखैरेवाडी, काऱ्हाटी, कारखेल, काटेवाडी, कांबळेश्वर, कुरणेवाडी, कुतवळवाडी, कोळोली, कोऱ्हाळे बु., कोऱ्हाळे खु.,खंडोबाची वाडी, खांडज, लाटे, लोणी भापकर, मळद, मगरवाडी, माळेगाव, मानाप्पा वस्ती, माळवाडी (लाटे), माळवाडी (लोणी), मासाळवाडी, मुर्टी, मुढाळे, मुरूम, मेखळी, मेडद, मोढवे, मोराळवाडी, मोरगाव, नारोळी, निंबोडी, निंबुत, नीरा वागज, पणदरे, पवईमाळ, पळशी, पारवडी, पानवरेवाडी, पाहुणेवाडी, पिंपळी, सावळ, सायंबाची वाडी, साबळेवाडी, शिरवली, शिर्सुफळ, शिरष्णे, सोनवडी सुपे, सोरटेवाडी, सदोबाची वाडी, सस्तेवाडी, सोनगाव, सोनकसवाडी, तरडोली, थोपटेवाडी, उंडवडी कप, उंडवडी सुपे, वढाणे, वंजारवाडी, वाणेवाडी, वाघळवाडी, वाकी, झारगडवाडी ग्रमापंचायतींचा समावेश होत आहे, तर दुसऱ्या बाजूला शासकीय अधिकाऱ्यांनी या निर्णयाचे संमिश्र स्वागत केले आहे. पंचायत समिती पदाधिकारी, ग्रामसेवक आणि तालुक्यातील विकास आराखडा मंजूर न झालेल्या गावातील सरपंचांनीही या निर्णयाचे संमिश्र स्वागत केले आहे.

या निर्णयामुळे बांधकामांना मंजुरी देण्याचे काम नगररचना अधिकाऱ्यांमार्फत होत असल्याने अनधिकृत बांधकामाला आळा बसू शकणार आहे. ग्रामपंचायतीला यातून तांत्रिक मदत मिळू शकणार आहे.
- मिलिंद मोरे, सहायक गटविकास अधिकारी

हा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत नगररचना अधिकाऱ्यांकडे येणार आहे. ते बांधकामांना मंजुरी देण्याची शिफारस सरपंचांना करणार असल्याने, या नियमामुळे विस्तार अधिकाऱ्यांवर पडणारा ताण कमी होणार आहे.
- दत्तात्रय खंडाळे, विस्तार अधिकारी पंचायत समिती बारामती

या निर्णयाचे मी स्वागत करते. कारण यामुळे बांधकामांना मंजुरी देण्याचे काम तांत्रिक अधिकारी करणार आहेत. आमच्याकडे त्या कामाची शिफारस करण्यात येत असल्याने अनधिकृत बांधकाम करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही.
- प्रियांका निलाखे,
सरपंच, डोर्लेवाडी

नगररचना अधिकाऱ्यांऐवजी याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात यायला हवेत. या निर्णयामुळे ग्रामस्थांना पंचायत समितीत हेलपाटे घालावे लागणार आहेत.
- अर्जुन शंकर यादव,
सरपंच, मळद

हा स्वागतार्ह निर्णय आहे. ग्रामपंचायतीला बांधकामाला मंजुरी देताना तांत्रिक अडचणी येत असतात. मात्र, या तांत्रिक अधिकाऱ्याच्या नेमणुकीमुळे ग्रामपंचायतीला मदतच होणार आहे.
- जी. एम. लडकत,
ग्रामसेवक, चांदगुडेवाडी

Web Title: Only four gram panchayats development plan approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.