आॅनलाइन औषधविक्री धोकादायक
By Admin | Updated: May 9, 2017 03:34 IST2017-05-09T03:34:28+5:302017-05-09T03:34:28+5:30
आॅनलाइन औषधं केवळ स्वस्त मिळतात या लोभास भुलून मान्यता नसलेल्या आॅनलाइन औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी केलेल्या

आॅनलाइन औषधविक्री धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : आॅनलाइन औषधं केवळ स्वस्त मिळतात या लोभास भुलून मान्यता नसलेल्या आॅनलाइन औषधविक्रेत्यांकडून औषधे खरेदी केलेल्या ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप फार्मासिस्ट आशिष हांडे यांनी केला आहे.
याबाबत हांडे म्हणाले, ‘आॅनलाइन खरेदी केलेल्या औषधांच्या बिलावर कोणाचीच म्हणजे मालक वा फार्मासिस्ट यांची सही नाही. हे नियमबाह्य असून, जबाबदारी झटकण्याचा बेजबाबदार प्रयत्न आहे. ओमेज-२० या गोळ्यांची एक्सपायरी डेट लिहिलेली नाही. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या ओमेजच्या १५ कॅप्सूल आम्ही ३६:३८ रुपयांना घेतो, त्याच १५ गोळ्या या आॅनलाइनवाल्यांकडून ५२:४१ रुपयांना विकल्या जात आहेत.
म्हणजेच या विक्रेत्याने आधीच जास्त रक्कम लावून त्यावर तुम्हास डिस्काउंट आॅफर केला आहे. अशा प्रकारे थेट फसवणूक केली जात आहे. आॅनलाइन औषध खरेदी केलेल्या बिलावर रुग्णाचे नाव, पूर्ण पत्ता लिहिलेला नाही.औषधे ट्रॅक करायची झाल्यास कशी करणार..? हा गुन्हा नाही का...? आॅनलाइनला परवानगी आलीच कधी...? आता एफडीए यांच्यावर काय कारवाई करणार..? हे गंभीर प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.असेही हांडे यांनी सांगितले.
याबाबत कुठल्याही प्रकारे कायदा पारित नसतानाही अयोग्य पद्धतीने बोगस औषधविक्री सुरू आहे. या बेकायदेशीर औषधविक्रीबाबत योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हांडे यांनी केली आहे.
याबाबत जानेवारी २०१६ मध्ये विविध फार्मासिस्ट संघटनांनी माझ्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे अंदोलनदेखील केले होते. परंतु, याबाबत सरकार गंभीरपणे दखल घेत नाही असे दिसून येत आहे. याचा सबळ पुरावा म्हणजे हे बिल होय. यामध्ये डॉ. रेड्डीज कंपनीची ओमेज कॅप्सुलच्या १५ कॅप्सुलची बाजारभाव किंमत ३६:३८ रुपये असूनही ग्राहकास ती खुलेआम ५२:४१ रुपयास विक्री करून ग्राहकाची आर्थिक लूट केली आहे.