ऑनलाइन शिक्षण निरूपयोगी, उपयोग शून्य अन खर्चिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:09 IST2020-12-09T04:09:16+5:302020-12-09T04:09:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जूनपासून मुलांच्या ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा श्रीगणेशा झाला असला तरी हे शिक्षण निरूपयोगी आणि ...

ऑनलाइन शिक्षण निरूपयोगी, उपयोग शून्य अन खर्चिक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जूनपासून मुलांच्या ‘ऑनलाइन’ शिक्षणाचा श्रीगणेशा झाला असला तरी हे शिक्षण निरूपयोगी आणि उपयोग शून्य असल्याचे निरीक्षण अझीम प्रेमजी विद्यापीठाने नोंदविले आहे. प्रत्यक्ष शिक्षणाचा अनुभव शिक्षक आणि विद्यार्थी या दोन घटकांना मिळतो.
अझीम प्रेमजी विद्यापीठाने केलेल्या अभ्यास पाहणीतून ही बाब समोर आली आहे. पुरेशी काळजी घेऊन आणि नियमाची काटेकोर अंमलबजावणी करून शाळा त्वरित सुरू करणे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदवले.
विद्यापीठाने पाच राज्ये आणि २६ जिल्ह्यांमध्ये ‘मिथ्स ऑफ ऑनलाइन एज्युकेशन’ नावाने अभ्यास पाहणी उपक्रम राबविला. या उपक्रमात दीड हजारच्यावर शाळा आणि त्यांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. ८० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा ऑनलाइन शिक्षणाबाबतचा अनुभव या अभ्यासाद्वारे नोंदविण्यात आला. विद्यापीठाच्या वेबसाइटवर हा अहवाल उपलब्ध आहे.
या पाहणीनुसार ऑनलाइन शिक्षण हे उपयोगशून्य आणि खर्चिक ठरले आहे. ऑनलाइन पद्धतीमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उणीव निर्माण झाली. विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकास ऑनलाईन शिक्षणातून होत नसल्याचे मत अनेक शिक्षक आणि पालकांनी नोंदवले. शिक्षण शालेय वर्गातूनच दिले पाहिजे, असे अनेक पालकांच्या लक्षात आले आहे. शिक्षण अनुभवण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेच्या तुलनेत ऑनलाइन शिक्षणाची रचना निरर्थक असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
----------------------------------------------
अभ्यास पाहणीतून समोर आलेले निष्कर्ष
*८० टक्के शिक्षक भावनिकदृष्ट्या जोडलेले नाहीत.
*६० टक्के विद्यार्थ्यांकडे कम्प्युटर, इंटरनेट, स्मार्ट फोन या
सुविधांचा अभाव आहे.
* अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले, विद्यार्थ्यांची अनुपस्थिती वाढली.
* ७० टक्के पालकांना ऑनलाइन शिक्षण व्यर्थ वाटते. यामुळे विनाकारण खर्च वाढला.
--------
नकारात्मकता नको
“ऑनलाइन शिक्षण हा शाळांसाठीचा पर्याय असू शकत नाही हे जरी खरे असले तरी या शिक्षणामुळे मुलांचे शिक्षण थांबले नाही. कोरोना काळात शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला ही जमेची बाजू आहे. ऑनलाइन शिक्षणाचा लाभ सर्व मुलांना घेता आला नसला तरी किमान जी काही १५ ते २० टक्के मुले आहेत, त्यांना शिक्षण घेता आले. जर शिक्षण प्रक्रिया बंदच राहिली असती तर समाजाने शैक्षणिक संस्थांच्या तोंडात बोटे घातली असती. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे नकारात्मक दृष्टीकोनातून न बघता किंवा त्याच्यावर टीका करण्यापेक्षा जे चांगले घडले त्याचा विचार करावा.”
- डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ
-----------------------------------------------