मुख्याध्यापकांना ऑनलाईन नेतृत्वगुण वाढीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:29+5:302020-12-04T04:29:29+5:30
पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेशन (निपा) संस्थेने तयार केलेल्या अभ्यासक्रमांच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन प्रशिक्षण संस्थेने ...

मुख्याध्यापकांना ऑनलाईन नेतृत्वगुण वाढीचे धडे
पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेशन (निपा) संस्थेने तयार केलेल्या अभ्यासक्रमांच्या धरतीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन प्रशिक्षण संस्थेने (मिपा) मुख्याध्यापकांच्या नेतृत्वगुण वाढीसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केला असून येत्या ३ डिसेंबर रोजी ‘शालेय नेतृत्व व व्यवस्थापन’ या अभ्यासक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना ऑनलाइन नेतृत्वगुण वाढीचे धडे गिरवता येणार आहेत.
मिपा संस्थेने नुकतीच पंचवीस वर्षे पूर्ण केली असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्याध्यापकांसाठी नेतृत्वगुण वाढीचा ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमास राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल द्विवेदी, निपा समन्वयक डॉ. सुनिता चुघ, डॉ.चारू मलिक उपस्थित राहणार आहेत.
मिपाच्या संचालक डॉ. नेहा बेलसरे म्हणाल्या, मुख्याध्यापकांनी स्वत:चा विकास लिडर म्हणून कसा करावा, शाळेचा विकास कोणत्या पध्दतीने करावा, अध्ययन-अध्यापन सुधारण्यासाठी लिडर म्हणून काय करावे,नव उपक्रम कसे राबवावेत, शाळा उत्तम चालण्यासाठी संघ बांधणी कशी करावी याबाबत मुख्याध्यापकांना ऑनलाइन अभ्यासक्रमातून मार्गदर्शन केले जाणार आहे. मुख्याध्यापकांनी कोरोनानंतर शाळा कशी चालवावी आदी गोष्टींची माहिती होण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.
निपाने इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये हा अभ्यासक्रम तयार केला असून मिपाने मराठीमध्ये मुख्याध्यापकांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. तीस तासांचा अभ्यासक्रम आहे. सहा आठवड्यात मुख्याध्यापकांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे, असेही बेलसरे यांनी स्पष्ट केले.