ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:19 IST2021-02-21T04:19:35+5:302021-02-21T04:19:35+5:30
वालचंदनगर: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये खंड पडला. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने ई- शैक्षणिक उपक्रम राबविल्याने ग्रामीण ...

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही
वालचंदनगर: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये खंड पडला. मात्र, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने ई- शैक्षणिक उपक्रम राबविल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाहीत, असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनी कोरोनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना ई-शिक्षणाचे धडे देण्यासाठी लर्न फ्रॉम होम या नावाने यू-ट्यूब चॅनेल सुरु केले होते. या चॅनेलवर दोन हजारहून अधिक व्हिडीओ चित्रफिती अपलोड केल्या होत्या. विद्यार्थ्यांना सुलभपणे आकलन होईल अशा पद्धतीने चित्रफिती असल्याने प्रत्यक्षात शाळा बंद असतानाही मुलांचे शिक्षण थांबले नव्हते. या चॅनेलवरील व्हिडीओ १ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी व पालकांनी पहिले होते. दरम्यान सदरचा उपक्रम राबवणाऱ्या शिक्षिकांनी शिक्षणाला कशा प्रकारे आपले योगदान दिले या विषयावर इंदापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने सावित्रीच्या लेकी हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या पुस्तक प्रकाशन भरणेवाडी येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सावित्रीच्या लेकी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे आदी उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, कोरोनामध्ये आपण खूप काही गमावलं असल, तरीही बरंच काही शिकताही आलं. जोपर्यंत स्वत:ला अडचण येत नाही तोपर्यंत माणूस निश्चिंत असतो. मात्र, ज्यावेळी त्याच्यावर जबाबदारी येऊन पडते तेव्हा आलेली परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवून जाते.यातूनच माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी स्वत: ऑनलाईनचे धडे गिरवून राज्यात आदर्शवत असा ई-शिक्षणाचा उपक्रम ग्रामीण भागात राबवला. या उपक्रमात सुमारे २० हजार विद्यार्थी सामील झाले होते. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळल्याने या शिक्षकांचा मला सार्थ अभिमान वाटत असल्याचे भरणे यांनी सांगितले.