आॅनलाइन जमा झाले १५५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 01:43 IST2016-09-07T01:43:16+5:302016-09-07T01:43:16+5:30

करदात्या नागरिकांना कर जमा करण्यासाठी पालिकेच्या कोणत्याही कार्यालयात यावे लागूच नये, यासाठी आॅनलाइन पेमेंटच्या विविध सुविधा देण्यात मिळकत कर विभागाने आघाडी घेतली आहे.

Online deposits 155 crores | आॅनलाइन जमा झाले १५५ कोटी

आॅनलाइन जमा झाले १५५ कोटी

पुणे : करदात्या नागरिकांना कर जमा करण्यासाठी पालिकेच्या कोणत्याही कार्यालयात यावे लागूच नये, यासाठी आॅनलाइन पेमेंटच्या विविध सुविधा देण्यात मिळकत कर विभागाने आघाडी घेतली आहे. ८ लाख ५० हजारांपैकी सुमारे ६ लाख करदात्या नागरिकांनी आतापर्यंत पालिकेत कर जमा केला असून, त्यातील तब्बल १ लाख ८४ हजार नागरिकांनी आॅनलाइन पेमेंट केले आहे.
या वर्षी आॅनलाइन पेमेंटद्वारे आतापर्यंत पालिकेकडे १५५ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षी एकूण जमा रकमेच्या फक्त १६ टक्के रक्कम आॅनलाइन पेमेंटद्वारे आली होती. या वर्षी मात्र एकूण जमा रकमेच्या ३२ टक्के रक्कम यापद्धतीने जमा झाली आहे. एक व्यक्ती पालिकेच्या कार्यालयात कर जमा करण्यासाठी आली की पालिकेला त्याच्या पावतीसह साधारण ५० रुपये खर्च त्यासाठी होतो.
१ लाख ८४ हजार व्यक्तींनी आॅनलाइन पेमेंट केल्यामुळे पालिकेची त्यासाठी येणाऱ्या सुमारे ९० लाख रुपये खर्चाची बचत झाली आहे. त्यामुळेच पालिका आता याचपद्धतीने पेमेंट व्हावे यासाठी विविध उपाययोजना करीत आहे.
या विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी ही माहिती दिली. इन्स्टापेमेंट अशी नवी संकल्पना सध्या सुरू करण्यात आली आहे. यात एकूण ६७ बँकांचा समावेश आहे. या बँकांबरोबर कनेक्ट असणाऱ्यांना या पद्धतीद्वारे पालिकेला त्यांचा मिळकत कर जमा करता येईल. बँकांनाही त्यांच्या ग्राहकांना विविध सुविधा द्यायच्या असल्याने यात पालिका, संबंधित बँका व मालमत्ताधारक अशा तिघांचाही फायदा आहे. याशिवाय क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा विविध प्रकारच्या १५ पेक्षा जास्त पद्धतीनेही मालमत्ताधारकांना त्यांचे पेमेंट करता येणार आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: Online deposits 155 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.