अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि गर्भवती केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:10 IST2021-03-18T04:10:33+5:302021-03-18T04:10:33+5:30

पुणे : आईचे निधन आणि वडील मनोरुग्ण असल्यामुळे घरातून निघून गेल्याने आजीच्या आधारावर जगत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी ...

One sentenced to life imprisonment for raping and impregnating a minor girl | अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि गर्भवती केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि गर्भवती केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा

पुणे : आईचे निधन आणि वडील मनोरुग्ण असल्यामुळे घरातून निघून गेल्याने आजीच्या आधारावर जगत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करून तिला गर्भवती केलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. ही दंडाची रक्कम पीडित मुलीला द्यावी, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. आरोपी हा पीडित मुलीशी विवाह करण्यासाठी तयार असताना देखील दोघांच्या वयातील अंतर, आरोपीने पीडित मुलीचा घेतलेला गैरफायदा लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा निकाल दिला आहे. आनंद पवार (वय ४५) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. मार्च २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत ही घटना घडली. पीडित मुलगी तिच्या ८० वर्षांच्या आजीबरोबर राहत होती. आरोपी हा आजीच्या घरी दहा वर्षांपासून भाडेकरू म्हणून वास्तव्यास होता. त्याची पत्नी आणि मुले मूळ गावी असल्याने तो इथे एकटाच राहात होता. व्यवसायाने ड्रायव्हर असल्यामुळे तो रात्री अपरात्री घरी येऊन टेरेसवर झोपायचा. कामावरून आल्यावर अंथरून घेण्याच्या बहाण्याने घराचा दरवाजा वाजून तो पीडित मुलीला टेरेसवर घेऊन जायचा. त्यावेळी ‘मी तुला सांभाळतो, तुला घर घेऊन देतो, तुझं लग्न लावून देतो’ असे सांगून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करत होता. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगू नको, तू जर घरात सांगितले तर तुझे नातेवाईक आपल्याला मारून टाकतील, अशी भीती तो पीडित मुलीला घालत होता.

दरम्यान, त्रास होऊ लागल्याने पीडित मुलगी सरकारी दवाखान्यात गेली असता तपासणी केल्यावर ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी पीडितेने पवार याला ती गरोदर असल्याचे सांगताच त्याने याबाबत कोणाला सांगू नको तुझा गर्भपात करू, असे सांगितले. मात्र, पोटामध्ये जास्त दुखू लागल्याने पीडित मुलीने पवार याला फोन केला असता, माझे नाव न घेता कोणाचेतरी नाव घेऊन आजीला घेऊन दवाखान्यात जा. त्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आजीला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने आजी आणि आत्याने पीडित मुलीला दवाखान्यात दाखल केले असता, पीडित मुलीने एका मुलाला जन्म दिला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले. खटल्यात त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरला. गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ॲड. हांडे यांनी युक्तिवादादरम्यान केली.

Web Title: One sentenced to life imprisonment for raping and impregnating a minor girl