फसवणूकप्रकरणी आणखी एकास अटक

By Admin | Updated: March 22, 2017 03:32 IST2017-03-22T03:32:47+5:302017-03-22T03:32:47+5:30

येथील जिल्ह्यातील महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यात पैसे नसताना यूपीआय अ‍ॅपद्वारे पैसे काढून अपहार केल्या प्रकरणातील

One more arrest in the cheating case | फसवणूकप्रकरणी आणखी एकास अटक

फसवणूकप्रकरणी आणखी एकास अटक

पुणे : येथील जिल्ह्यातील महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यात पैसे नसताना यूपीआय अ‍ॅपद्वारे पैसे काढून अपहार केल्या प्रकरणातील आणखी एकाला पुणे गुन्हे शाखेच्या सायबर सेलने मंगळवारी अटक केली़
गणेश मारुती डोमसे (वय ३५, रा़ तेजेवाडी, ता़ जुन्नर) असे त्याचे नाव आहे़ या प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली आहे़ अपहार केल्याची रक्कम ६ कोटी २२ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे़
डोमसे याने जुन्नर तालुक्यातील १० शेतकऱ्यांना तुमच्या बँक खात्यात पंतप्रधान योजनेतून ५ हजार रुपये जमा होणार असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन सिमकार्ड घेतले़ ते त्यांनी यातील फरारी आरोपी विनोद नायकोडी, स्वप्निल विश्वासराव यांच्याकडे दिले़ त्यांनी या १० बँक खात्यांमार्फत तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांचा अपहार केला आहे़ महाराष्ट्र बँकेच्या खात्यातून यूपीआय अ‍ॅपद्वारे काढण्यात आलेल्या पैशांपैकी सर्वाधिक पैसे या १० जणांच्या खात्यातून काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे़
अधिक तपासासाठी त्यांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार अधिक तपास करीत आहेत़

Web Title: One more arrest in the cheating case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.