मंचरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
By Admin | Updated: April 15, 2017 03:46 IST2017-04-15T03:46:43+5:302017-04-15T03:46:43+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ शुक्रवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी उपोषणात सक्रिय

मंचरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण
मंचर : येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ शुक्रवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी उपोषणात सक्रिय सहभाग घेतला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. उद्या आरोग्य संचालक यांच्याबरोबर बैठक घेऊन येथील समस्या मांडल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सुविधा बहुतांशी बंद आहेत. रुग्णालयातील दुरवस्थेचा निषेध करत आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. रुग्णालयाच्या बाहेर पंडाल टाकून उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते. सकाळी उपोषणाला सुरुवात झाली. अनेक नागरिकांनी उपोषणस्थळी येऊन या उपोषणाला पाठिंबा दिला. ७२ स्वयंसेवी संस्थांनी उपोषणाला पाठिंबा दिला असून, तसे पाठिंब्याचे पत्र संस्थांच्या वतीने देण्यात आले आहे. डॉ. प्रमोद बाणखेले व अॅड. राहुल पडवळ यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले.
या वेळी हभप शंकरमहाराज शेवाळे, युवराज बाणखेले, डॉ. मंगेश बाणखेले, शरदराव शिंदे, शरदराव पोखरकर, घोडेगाव वकील संघाचे सचिव अॅड. सुदाम मोरडे, अॅड. नीलेश शेळके, उद्योजक अजय घुले, खरेदी-विक्री संघाचे संचालक पांडुरंग पाटील, बादशाह इनामदार, पंढरीनाथ बारवे, प्रवीण मोरडे, नरेंद्र गुरू थोरात, जि. प. सदस्य अरुणा थोरात, सुषमाताई शिंदे, ग्रा. पं. सदस्य कविता थोरात, लक्ष्मण भक्ते, डॉ. सदानंद राऊत, डॉ. वैभव सुपेकर, अल्लू इनामदार, संजय बाणखेले, डॉ. सीमा खिवंसरा, दत्ता थोरात, सुषमाताई शिंदे आदी उपस्थित होते.
सायंकाळी दिलीप वळसे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपसभापती गणपतराव इंदोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख, गटविकास अधिकारी राहुल काळभोर आदी होते. (वार्ताहर)
मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाला यापूर्वी आनंदीबाई जोशी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. रुग्णालयात काही त्रुटी जरूर निर्माण झाल्या आहेत. त्यामुुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांची असुविधा होते. त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.
- दिलीप वळसे पाटील,
विधानसभेचे माजी अध्यक्ष