दौंड : दौंड तालुक्यातील मूळगार येथील भीमा नदीपात्रत वाळू चोरीप्रकरणी एकनाथ भोंग (वय 22, रा. लातूर) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती तपासी अंमलदार रामचंद्र भिलारे यांनी दिली.
दरम्यान संतोष गावडे (रा. बेटवाडी, ता. दौंड), सोमनाथ कांबळे (रा नवीन गार दौंड), कुल (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यासह अन्य दोघे ट्रॅक्टर चालक फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. गार ग्रामपंचायतीने भीमा नदीपात्रत वाळू उपसा न करण्याचा ठराव केलेला आहे. त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात वाळू चोरी सुरु झाली होती. त्यानुसार रविवारी रात्री वाळू तस्कर आणि ग्रामस्थ यांच्यात भीमा नदीपात्रत हमरीतुमरी झाली. प्रसंगी काही वाळू चोरटय़ांनी तलवारी काढून धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पावित्र घेतल्याने वाळू चोरटे फरार झाले होते. सदरची घटना तहसीलदार उत्तम दिघे यांना कळाल्यानंतर तातडीने महसूल खात्याने यासंदर्भात आक्रमक भूमिका घेऊन जेसीबी जप्त केला आहे. दरम्यान मंडलाधिकारी महादेव ठोंबरे यांनी 81 हजार 900 रुपयांची वाळू चोरीप्रकरणी पोलीसांना फिर्याद दिली आहे.
(वार्ताहर)