थकबाकीदारही करणार मतदान
By Admin | Updated: February 24, 2015 00:27 IST2015-02-24T00:27:10+5:302015-02-24T00:27:10+5:30
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार देऊ नये, या संदर्भात उच्च न्यायालयात

थकबाकीदारही करणार मतदान
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार देऊ नये, या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने या मतदारांना आता मतदानाचा अधिकार मिळणार आहे.
शेतकरी कृती समितीचे नेते रंजन तावरे यांनी सलग तीन वर्ष ऊस पुरवठा न केलेले सभासद, जमीन नसलेले सभासद, थकबाकीदार व मृत सभासदांची नावे मतदार याद्यांमध्ये समावेश केला असल्याची न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणाची सुनावणी आज न्यायालयापुढे होती. योगायोग म्हणजे सुनावणी असतानाच आजच दि. २३ रोजीच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे या प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे या घटनात्मक पेचावर पडदा पडला आहे. न्यायालयाचा आम्ही आदर करतो. मात्र, प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम २५ तारखेला जाहीर होणार, असे सांगितले होते. त्यापूर्वीच कार्यक्रम जाहीर झाला आहे. आता आम्ही जनतेच्या दरबारात न्याय मागू. प्रशासनाने तीन दिवस उशिराने जाहीर होणारा कार्यक्रम आजच जाहीर केला. त्यामुळे माळेगावच्या कार्यक्षेत्रातील सुज्ञ ऊस उत्पादक सभासद योग्य तो निर्णय घेतील, असे याचिकाकर्ते रंजन तावरे यांनी सांगितले.