जुने प्रकल्प पूर्ण करणार

By Admin | Updated: February 11, 2017 02:58 IST2017-02-11T02:58:43+5:302017-02-11T02:58:43+5:30

आगामी महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. या जाहीरनाम्यामध्ये नवीन प्रकल्प

Old projects will be completed | जुने प्रकल्प पूर्ण करणार

जुने प्रकल्प पूर्ण करणार

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. या जाहीरनाम्यामध्ये नवीन प्रकल्प, योजना राबविण्याची घोषणा करण्याऐवजी कार्यान्वित झालेले मेट्रो, विकास आराखडा, पीएमआरडीए, वाहतूक आराखडा, बीआरटी, नदीसुधारणा, २४ तास पाणीपुरवठा आदी कार्यान्वित झालेल्या योजना व प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले आहे.
भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘सैराट’ चित्रपटातील झिंगाटच्या चालीवर भाजपाला मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या सीडीचेही प्रकाशन करण्यात आले. भाजपाकडून २९ जानेवारी रोजी प्रारूप जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला होता, त्यावर नागरिकांच्या सूचना मागविल्या. शहरातील २० हजार नागरिकांनी यासाठी त्यांच्या सूचना व अभिप्राय पक्षाकडे पाठविले.
भाजपाच्या प्रारूप जाहीरनाम्यात स्मार्ट सिटी, मेट्रो, बीआरटी,
रिंगरोड, उड्डाणपूल, वाहतुकीचा एकात्मिक विकास आराखडा, महिलांसाठी उद्योगगट, स्वच्छतागृहे, योग केंद्र, ज्येष्ठांच्या योजना आदी प्रमुख मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता. या मुद्द्यांवर विस्तार अंतिम जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
महापालिकेच्या मुख्यसभेने २४ तास पाणीपुरवठा योजनेला यापूर्वीच मान्यता दिलेली आहे, ती योजना पूर्ण करू, भूमिपूजन होऊन काम सुरू झालेल्या मेट्रो प्रकल्पाची प्रक्रिया विनाविलंब पार पाडू, शहराच्या विकास आराखड्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करू, पीएमआरडीए अंतर्गत रिंगरोड विकसित करू, बीआरटी मार्गाचे शहरभर जाळे निर्माण करू आदी आश्वासने भाजपाकडून देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Old projects will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.