बँकांमध्ये जुन्या नोटांची कोंडी
By Admin | Updated: November 16, 2016 03:35 IST2016-11-16T03:35:18+5:302016-11-16T03:35:18+5:30
राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बँकांमधून मोठ्या प्रमाणावर जुन्या हजार-पाचशेच्या नोटांचा भरणा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

बँकांमध्ये जुन्या नोटांची कोंडी
पुणे : राष्ट्रीयीकृत बँकांसह सहकारी बँकांमधून मोठ्या प्रमाणावर जुन्या हजार-पाचशेच्या नोटांचा भरणा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. मात्र रिझर्व्ह बँकेकडून या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याने या नोटा आता ठेवायच्या कोठे, असा प्रश्न बँक व्यवस्थापकांना पडला आहे.
जुन्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर भरणा विविध बँकांत होत आहे. सहकारी बँकांची खाती विविध राष्ट्रीयीकृत बँकेत असतात. राष्ट्रायीकृत बँका रिझर्व्ह बँकेला जबाबदार असतात. रद्द झालेल्या या नोटा अंतिमत: अरबीआयकडे जमा होणार आहेत. मात्र आरबीआयकडेच जुन्या चलनी नोटा ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने राष्ट्रीयीकृत बँकांकडून जुने चलन स्वीकारणे बंद झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनीही तोच कित्ता सहकारी बँकांनाही लागू केला आहे. परिणामी पन्नास कोटी रुपयांची क्षमता असलेल्या सहकारी बँकेतही आता सत्तर ते ऐेंशी कोटी रुपये जमा होत आहेत. हा जमा होणारा पैसा ठेवायचा कोठे? असा प्रश्न सहकारी बँकांना सतावत आहे.
आधीच राष्ट्रीयीकृत बँकांकडून सहकारी बँकांना अत्यल्प निधी मिळत असल्याने खातेदारांना पैसे देता येऊ शकत नाहीत. राष्ट्रीयीकृत बँका जुने चलन स्वीकारत नसल्याने त्याचा साठा वाढत आहे. त्यामुळे जमा होणारे चलन ठेवायचे कोठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुहेरी कात्रीत सहकारी बँका सापडल्या आहेत. त्यामुळे सहकारी बँकांबाबत नागरिकांमध्ये चुकीचा समज पसरण्याची शक्यता सहकारी बँकांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्याने जुन्या चलनी नोटांचा स्वीकार आरबीआयकडून थांबविण्यात आला असल्याचे सांगितले. जुन्या नोटा ठेवण्यासाठी त्यांच्याकडेदेखील पुरेशी जागा नाही. राष्ट्रीयीकृत बँकांकडेच जुन्या चलनी नोटांचा साठा अधिक झाल्याची पुष्टीदेखील त्याने जोडली.