तेल्याचे एकात्मिक पध्दातीने व्यवस्थापन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:03+5:302021-07-23T04:09:03+5:30
उरुळी कांचन : "शेतकऱ्यांनी डाळींब बागा उपटून न टाकता तेल्या रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे व तेल्याग्रस्त बागेत जास्त ...

तेल्याचे एकात्मिक पध्दातीने व्यवस्थापन करावे
उरुळी कांचन : "शेतकऱ्यांनी डाळींब बागा उपटून न टाकता तेल्या रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे व तेल्याग्रस्त बागेत जास्त असलेली फळे काढून टाकावीत त्यामुळे तेल्या रोगावर नियंत्रण मिळवता येईल असे मत कृषी विभागाचे शास्त्रज्ञ सुनील जोगदंड यांनी व्यक्त केले.
कृषी विभागातर्फे डाळींब पिकावरील तेल्या रोगाची पाहणी राहुरी येथील वैज्ञानिकांनी टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीतील डाळिंब पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भेट दिली यावेळी जोगदंड बोलत होते. टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीसह परिसरात पाचशे एकर पेक्षा जास्त डाळिंब पिक घेतले जाते. त्यापैकी ८० टक्के डाळिंब बागा तेल्या ग्रस्त झाल्यामुळे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष पॅकेज मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावा. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, हडपसर विभागाचे कृषी अधिकारी गुलाबराव कडलक, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक राजेंद्र भोसेकर, महेश महाडिक, पर्यवेक्षक रामदास डावखर, माजी कृषी अधिकारी संजय टिळेकर, शेतकरी सदाशिवराव टिळेकर, अक्षय टिळेकर, योगेश टिळेकर, संतोष राऊत आदी उपस्थित होते. यावेळी सुनील जोगदंड यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ डॉ. श्रीहरी हसबनीस यांना विडिओ कॉन्फरन्स वर डाळिंबाच्या बागा दाखविल्या.
त्यावर कृषी शास्त्रज्ञ डॉ श्रीहरी हसबनीस म्हणाले की, डाळिंबाचा पुढील बहार हा ऑक्टोबरमध्ये धरावा म्हणजे तेल्याचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच ऑक्टोबर मध्ये धरल्या जाणाऱ्या बहारासाठी टिळेकरवाडीला राहुरी कृषी विद्यापीठाची टीम पुन्हा येईल व मार्गदर्शन करेल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. डाळिंबावर दरवर्षी तेल्या हा विषाणुजन्य रोग पिक अंतिम टप्प्यात आल्यावर येतो व शेतकऱ्याचे केलेले सर्व कष्ठ व खर्च वाया जातो यावर गेले कित्येक वर्षात नेमकी उपाययोजना का सापडत नाही हा खरा संशोधनाचा भाग असुन कोरोना सारख्या विषाणू व संसर्गजन्य मानवी आजारावर लस सापडते तर यावर का सापडत नाही ? हे कोडे उलगडत नाही अशी खंत संजय टिळेकर या शेतकऱ्याने पोटतिडकीने व्यक्त केली.