पदाधिकाऱ्यांची कोटींची उड्डाणे
By Admin | Updated: February 10, 2017 03:31 IST2017-02-10T03:31:49+5:302017-02-10T03:31:49+5:30
महापालिकेमध्ये मागील ५ वर्षांत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते आदी महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या संपत्तीने कोटीच्या कोटी रुपयांची उड्डाणे घेतली

पदाधिकाऱ्यांची कोटींची उड्डाणे
पुणे : महापालिकेमध्ये मागील ५ वर्षांत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते आदी महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या संपत्तीने कोटीच्या कोटी रुपयांची उड्डाणे घेतली असल्याचे स्पष्ट होते आहे. जमिनींचे भाव वाढल्याने स्थावर मालमत्तेच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीमुळे संपत्तीच्या आकड्यांमध्ये वाढ झाली़
महापालिकेची सर्वांत शक्तिशाली समिती असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा मान बाबूराव चांदेरे, विशाल तांबे, बापूराव कर्णे गुरुजी, अश्विनी कदम व बाळासाहेब बोडके या माननीयांना मिळाला. बाबूराव चांदेरे यांची २०१२ मध्ये १७ कोटी १८ लाख इतकी संपत्ती होती, २०१७ मध्ये त्यात वाढ होऊन ती ४० कोटी ४६ लाखांवर पोहोचली आहे. विशाल तांबे यांची २ कोटी ३५ लाखांवरून ३ कोटी ८८ लाखांइतकी संपत्ती झाली आहे. बापूराव कर्णे गुरुजी यांची संपत्ती अवघी ९१ लाख इतकी होती, ती १ कोटी ७५ लाखांवर पोहोचली आहे. बाळासाहेब बोडके यांची संपत्ती ३२ लाख ३१ हजारांवरून २ कोटी ७१ लाखांवर पोहचली आहे.
सभागृह नेते बंडू केमसे यांच्या संपत्तीमध्ये २५ कोटी ४८ लाखांवरून ६६ कोटी १६ लाख इतकी वाढ झाली आहे. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांची संपत्ती ३ कोटी ९६ लाखांवरून ९ कोटी २३ लाखांवर पोहोचली आहे.
दत्तात्रय बहिरट यांची मालमत्ता २२ कोटींवर
काँग्रेसकडून दत्तात्रय बहिरट यांनी आपली एकूण मालमत्ता २२ कोटी २० लाख ८१ हजार २०६ रुपये दर्शविली आहे़ त्यात ते स्वत: व त्यांच्यावरील अवलंबित पत्नी व दोन मुलांच्या मालमत्तेचा समावेश आहे़ त्यांच्यावर विविध वित्तीय संस्थांकडील ३ कोटी ८५ लाख ३७ हजार ६२९ रुपयांचे कर्ज आहे़ दत्तात्रय बहिरट यांनी २०१२ मध्ये महापालिका निवडणूक लढविली होती़ त्यावेळी त्यांनी आपली एकूण मालमत्ता १५ कोटी ९७ लाख ६५ हजार ७१६ रुपये होती, असे शपथपत्रात नमूद केले आहे़ माजी आमदार दिवंगत रमेश वांजळे यांच्या कन्या सायली यांची संपत्ती १५ कोटी ६२ लाख २६ हजार इतकी आहे.
शिरोळे घराणे हे जुन्या भांबुर्डा परिसरातील एक मोठे प्रस्थ १०० वर्षांहून अधिक काळ आहे़ या घराण्यातील खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांनी आपली एकूण मालमत्ता ७ कोटी २० लाख ५८ हजार ६४९ रुपये दर्शविली आहे़ त्यांच्यावर विविध वित्तीय संस्थांकडील ७८ लाख ८५ हजार रुपयांचे कर्ज आहे़ ते यंदा प्रथम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक चेतन तुपे यांची संपत्ती १४ कोटी १० लाख रुपये आहे़
गाववालेच सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
कोट्यधीशांच्या संख्येत देशात पुणे आघाडीवर असले तरी महापालिकेच्या निवडणुकीत मात्र पुण्यामध्ये कोट्यधीशांची संख्या कमी आहे! बहुतांश उमेदवारांनी आपली मालमत्ता कमीच दाखविली आहे. मात्र, गाववाल्या घराण्यांतील उमेदवारांच्या स्थावर मालमत्तेची किंमत वाढली आहे.
धानोरी परिसरातील टिंगरे घराण्यातील महापालिकेतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार कदाचित धानोरी प्रभागातून लढणाऱ्या रेखा टिंगरे ठरणार आहे. त्यांनी १३४ कोटी रुपयांची संपत्ती दाखविली आहे. यामध्ये पती चंद्रकांत टिंगरे यांच्या नावावरील स्थावर मालमत्ताच १३० कोटी रुपयांची आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी महापालिकेच्या उमेदवार म्हणून रेखा टिंगरे यांनी २४ कोटी रुपयांची संपत्ती दाखविली होती.
कोरेगाव पार्क परिसरातील स्थानिक मुळीक घराण्यातील योगेश मुळीक यांची संपत्ती १०९ कोटी ९८ लाख रुपये इतकी आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी ७४ कोटी रुपयांची संपत्ती दाखविली होती. धायरी परिसरातील अक्रुर कुदळे यांची संपत्ती ९९ कोटी रुपये आहे. गेल्या वेळी त्यांच्या पत्नी संगीता महापालिकेत नगरसेवक होत्या. त्यांची संपत्ती ५५ लाख ७७ हजार एवढी होती. तर २००७ च्या निवडणुकीत अक्रुर कुदळे महापालिका लढताना त्यांची संपत्ती १ कोटी १८ लाख २६ हजार इतकी होती. मुंढवा येथील गाववाले असलेले माजी उपमहापौर बंडू ऊर्फ सुनील गायकवाड यांची संपत्ती ८१ कोटी रुपये आहे. त्यांनी २००२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढविताना दीड लाख रुपये एवढी संपत्ती दाखविली होती.
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले भारतीय जनता पक्षाकडून लढत आहेत. भोसले घराण्याला राजकारणात आता १०० वर्षे होत असून या घराण्यातील रेश्मा भोसले या दुसऱ्यांदा निवडणुकीला उभ्या आहेत़ त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची मालमत्ता ६४ कोटी ३० लाख ९३ हजार १६५ रुपये दर्शविली आहे़ त्यात त्यांचे पती आमदार अनिल भोसले व दोन मुलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा समावेश आहे़
त्यांच्यावर विविध वित्तीय संस्थांकडील ७ कोटी ३४ लाख २ हजार ७८२ रुपये कर्ज आहे़ २०१२ मध्ये रेश्मा भोसले यांनी महापालिका निवडणूक लढविली होती़ त्यावेळी त्यांनी आपली एकूण मालमत्ता १४ कोटी ६० लाख ६० हजार रुपये असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे़
भुसारी कॉलनी परिसरातील बंडू केमसे यांनी ६६ कोटी ६६ लाख रुपये संपत्ती असल्याचे नमूद
केले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सभागृह नेते असलेल्या केमसे यांची गेल्या वेळी संपत्ती २५ कोटी ४८ रुपये होती.
औंधमधील कैलास गायकवाड यांची संपत्ती ४१ कोटी रुपये आहे. गेल्या वेळी त्यांची संपत्ती २५ कोटी ५० लाख रुपये होती. नगरसेवक श्रीनाथ भीमाले यांची संपत्ती ४० कोटी रुपये आहे. गेल्या वेळी त्यांची संपत्ती २० कोटी २१ लाख रुपये होती.
वारजे भागातील स्थानिक
असलेले नगरसेवक सचिन
दोडके यांची ४६ कोटी रुपये आहे. गेल्या वेळी त्यांची संपत्ती ६ कोटी ६९ लाख इतकी होती. माजी नगरसेविका सुजाता शेट्टी यांची संपत्ती २४ कोटी ७९ लाख रुपये आहे. २००७ मध्ये त्यांची संपत्ती १ कोटी ७ लाख रुपये होती.