मसापच्या साहित्य पुरस्कारांचे राजभाषा दिनी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:12 IST2021-02-16T04:12:21+5:302021-02-16T04:12:21+5:30

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मानाचे साहित्य पुरस्कार कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिवशी अर्थात मराठी राजभाषा दिनी दिले जातात. ...

Official Language Day Distribution of MCA Literary Awards | मसापच्या साहित्य पुरस्कारांचे राजभाषा दिनी वितरण

मसापच्या साहित्य पुरस्कारांचे राजभाषा दिनी वितरण

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मानाचे साहित्य पुरस्कार कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिवशी अर्थात मराठी राजभाषा दिनी दिले जातात. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. हे सर्व पुरस्कार शनिवार (दि. २७) रोजी सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांच्या हस्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करणार आहेत. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्यवाह बंडा जोशी यांनी दिली.

काँटिनेंटल प्रकाशन पुरस्कृत, कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार कवी देवा झिंजाड (पुणे) यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहाला दिला जाणार आहे. हा संग्रह प्रकाशित करणाऱ्या हार्मिस प्रकाशनच्या प्रिया सुशील धसकटे यांनाही पुरस्कार दिला जाणार आहे.

कै. द. वा. पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, इतिहासविषयक ग्रंथाला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी, डॉ. संतोष जाधव (सोलापूर) यांच्या ‘आंबेगाव तालुक्याचा इतिहास’ या ग्रंथाची निवड केली आहे. प्रख्यात समीक्षक कै. रा. श्री. जोग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, समीक्षा ग्रंथाला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी, डॉ. द. ता. भोसले (पंढरपूर) यांच्या ‘एक कवी एक कविता’ या समीक्षा ग्रंथाची निवड केली आहे. ग्रंथाचे प्रकाशक म्हणून मधुराज पब्लिकेशन यांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे.

सामाजिक/सांस्कृतिक/वैचारिक/ऐतिहासिक ग्रंथाला दिल्या जाणाऱ्या कै. शं. ना. जोशी स्मृती पुरस्कारासाठी शेखर देशमुख (मुंबई) यांच्या ‘उपरे विश्व’ या ग्रंथाची निवड केली आहे. नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहाला दिल्या जाणाऱ्या कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कारासाठी कवयित्री अंजली ढमाळ (सातारा) यांच्या ‘ज्याचा-त्याचा चांदवा’ या कवितासंग्रहाची निवड केली आहे. या वर्षीपासून उत्कृष्ट ललित लेखनासाठी कै. निर्मला मोने स्मृती पुरस्कार देणार आहे. या वर्षीच्या पुरस्कारासाठी चंद्रमोहन कुलकर्णी (पुणे) यांच्या ‘बिटवीन द लाईन्स’ ललित लेखसंग्रहाची निवड केली आहे.

Web Title: Official Language Day Distribution of MCA Literary Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.