पगार काढण्यासाठी अधिकारीच मिळेना
By Admin | Updated: January 24, 2017 02:53 IST2017-01-24T02:53:22+5:302017-01-24T02:53:22+5:30
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वेतन पथकाची (पे-युनिट) जबाबदारी स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली

पगार काढण्यासाठी अधिकारीच मिळेना
पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वेतन पथकाची (पे-युनिट) जबाबदारी स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पे-युनिटची जबाबदारी स्वीकारण्यास शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. परंतु, यामुळे पुणे विभागातील खासगी प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून विनावेतन काम करावे लागत आहे.
पुणे विभागाच्या वेतन पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याच्या कामाची जबाबदारी मदन हगवणे यांच्याकडे देण्यात आली. परंतु, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून बी. एम. बोरनारे यांच्याकडे वेतन पथकाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. मात्र, बोरनारे यांनीही हा कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे काही शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांची भेट घेऊन पे-युनिटमध्ये काम करण्यास अधिकारीच नाही, अशी तक्रार केली. त्यावर नांदेडे यांनी बोरनारे यांना दूरध्वनीवरून खडसावले.
त्यावर या पदाची जबाबदारी घेऊ नको, तुला दोन महिन्यांत घरी बसवू, अशी धमकी मला देण्यात
आल्याने मी हा पदभार स्वीकारत नसल्याचे बोरनारे यांनी त्यांना सांगितले. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली असून, आयुक्त कार्यालयास कळविले असल्याचे नमूद केले.