अधिकारीच ग्रामसेवकाच्या पाठीशी
By Admin | Updated: May 18, 2015 23:15 IST2015-05-18T23:15:06+5:302015-05-18T23:15:06+5:30
विस्तार अधिकाऱ्यांनी पौड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारविषयी ३१ डिसेंबर व जानेवारीदरम्यान चौकशी करून अहवाल दिला होता़

अधिकारीच ग्रामसेवकाच्या पाठीशी
पौड : पौड ग्रामपंचायतीत झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत मुळशी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल देऊन सहा महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही़
विस्तार अधिकाऱ्यांनी पौड ग्रामपंचायतीतील गैरव्यवहारविषयी ३१ डिसेंबर व जानेवारीदरम्यान चौकशी करून अहवाल दिला होता़ मुळशी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शालिनी कडू यांनी या चौकशी अहवालावरून ग्रामसेवक व्ही़ टी़ कदम यांना १७ मार्च २०१५ रोजी पत्र पाठवून या गैरव्यवहाराविषयी ७ दिवसांत पुराव्यासह खुलासा सादर करण्याचा आदेश दिला होता़ या पत्रावरूनच पौड ग्रामपंचायतीत ही बाब उघड झाली आहे़
चौकशीत दोषी आढळलेले ग्रामसेवक आणि अन्य अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पौडचे माजी सरपंच विनायक गुजर व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांच्याकडे केली आहे़
शालिनी कडू यांनी दिलेल्या ज्ञापनात पुढील बाबींचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. पौड ग्रामपंचायतीने ग्राहकांकडून वसूल केलेल्या रकमा बँक खात्यात जमा न करता, त्याची परस्पर विल्हेवाट लावणे़, पाणीपुरवठा विभागाची थकबाकी न भरता ती भरली असल्याचे दाखवून प्रशासन व नागरिकांची दिशाभूल करणे़, तसेच २०१३ ते २०१५ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण १९ विविध प्रकारची कामे अंदाजपत्रकाशिवाय करणे, जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार पूर्णत्वाचा दाखला असल्याखेरीज मिळकतींच्या नोंदी करण्यावर निर्बंध असतानाही ५० घरांच्या नोंदी करणे, ग्रामपंचायतीत नमुना नंबर ७ ते १० ने वसूल होणाऱ्या रकमा बँकेत न भरता परस्पर खर्च करणे, यासारखे गैरप्रकार करून
नियमबाह्य काम केल्याचे आरोप सिद्ध झाल्याचे गटविकास अधिकारी
यांनी पौड ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रात म्हटले होते.
संबंधित दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना शालिनी कडू जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याचा थेट आरोप विनायक गुजर यांनी १५ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रातून केला आहे.
विनायक गुजर यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला असून गेल्या आॅगस्टपासून प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला आहे. (वार्ताहर)
४याबाबत शालिनी कडू यांना अधिक माहिती विचारली असता, त्या सध्या व्यक्तिगत कामाकरिता दीर्घकालीन सुट्टीवर असल्याने, त्यांच्या अनुपस्थितीत काम पाहणारे पौड पंचायत समितीचे अधिकारी खाडे यांनी याबाबत संपूर्ण अचूक माहिती आपल्याला नसून, ही माहिती शालिनी कडूच देतील, असे सांगितले़ व्ही़ टी़ कदम यांच्याशी संपर्क होऊ
शकला नाही़
४पौड ग्रामपंचायतीचे सदर गैरव्यवहार प्रकरण आता चांगलेच तापले असून, या प्रकरणातील दोषींवर कोणती व कशाप्रकारची कारवाई होणार व कधी होणार, याकडेच संपूर्ण मुळशी तालुक्याचे लक्ष
लागले आहे.
पौडमधील ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून मुळशी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले होते़ गटविकास अधिकाऱ्यांकडून हा अहवाल अद्याप आपल्याला मिळाला नाही़
- नितीन माने
उपमुख्य कार्यकारी
अधिकारी, जि़ प़