पंतप्रधानांच्या स्वागताची परवानगी ‘त्या’ पदाधिकाऱ्यांना नाकारली !
By Admin | Updated: January 6, 2015 00:05 IST2015-01-06T00:05:47+5:302015-01-06T00:05:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावेळी स्वागतासाठी गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्याच त्या तीन पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी प्रवेश नाकारला.

पंतप्रधानांच्या स्वागताची परवानगी ‘त्या’ पदाधिकाऱ्यांना नाकारली !
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावेळी स्वागतासाठी गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्याच त्या तीन पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी प्रवेश नाकारला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कोणालाही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी परवानगी देऊ नये, अशा पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना असल्याने पोलीसांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘ज्ञानसंगम’ या बॅँकींगविषयक परिषदेसाठी पुण्यात आले होते. त्यापूर्वी पंतप्रधानांच्या राजशिष्टाचार विभागाने त्यांच्या स्वागतासाठी शहरातील पक्षाचे कोणकोणते पदाधिकारी उपस्थित राहणार याची यादी मागविली होती़ त्यानुसार पक्षाकडून यादी पोलिसांना देण्यात आली होती़ पुण्यातील रेसकोर्स मैदानावर हवाईदलाच्या हेलीकॉप्टरने त्यांचे आगमन झाले. या वेळी पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, भाजपचे काही आमदार आणि वरिष्ठ सनदी अधिकारी मोदी यांचे स्वागत करण्यासाठी रेसकोर्सवर उपस्थित होते. त्यांच्यासोबत जाण्यास भाजपचे ‘हे’ पदाधिकारी छुक होते. मात्र, त्यांना दूर ठेवण्याच्या सूचना पोलिसांकडून आल्याने परवानगी नाकारण्यात आली. त्यात शहराच्या पूर्व भागातील एक नेते तर दुसरे अनेक आंदोलनात गुन्हे दाखल झालेले सदाशिव पेठेतील नेते व बिबवेवाडी परिसरातील एका नेत्यांचा समावेश होता़ (प्रतिनिधी)