काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी
By Admin | Updated: March 13, 2015 06:29 IST2015-03-13T06:29:07+5:302015-03-13T06:29:07+5:30
जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास आराखड्यावरील (डीपी) चर्चेवेळी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांचा ऐकरी उल्लेख एका पदाधिकाऱ्याकडून झाला

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी
पुणे : जुन्या हद्दीच्या प्रारुप विकास आराखड्यावरील (डीपी) चर्चेवेळी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांचा ऐकरी उल्लेख एका पदाधिकाऱ्याकडून झाला. त्यावरून उपमहापौर आबा बागुल व गटनेते अरविंद शिंदे यांच्यात बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. दोन पदाधिकाऱ्यांच्या या वादामुळे काँग्रेसची डीपीवरील बैठक आज (शुक्रवारी) पुन्हा घेण्याचा निर्णय झाला.
प्रारुप विकास आराखड्यातील बांधकाम नियमावलीचे (डीसी रुल) सादरीकरण मुख्यसभेत करण्यात आले. मात्र, त्याविषयी काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचे आक्षेप आहेत. त्यामुळे डीपीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस भवन येथे आज बैठक झाली. त्यावेळी शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, आबा बागुल, अरविंद शिंदे, मुकारी अलगुडे, संजय बालगुडे, अविनाश बागवे यांच्यासह १५ नगरसेवक उपस्थित होते.
विकास आराखड्यावर नियोजन समिती नियुक्त करण्यास जादा कालावधी लागला आहे. त्यामुळे डीपी मंजुरीला आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. त्यावर समिती नियुक्त करण्यासाठी कोणामुळे उशीर लागला. त्यावेळी आपलेच सरकार अन् मुख्यमंत्री होता, असा उल्लेख दुसऱ्या एका पदाधिकाऱ्याने केला. मात्र, मुख्यमंत्री यांच्यासारख्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांबद्दल एकेरी शब्द वापरल्याचा आक्षेप बागुल यांनी घेतला. त्यावरून शिंदे व बागुल यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. अखेर वादावर पडदा टाकण्यासाठी ही बैठक उद्या पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.