खतप्रकल्पाचा नालेप्रवाहाला अडथळा
By Admin | Updated: June 26, 2017 03:57 IST2017-06-26T03:57:58+5:302017-06-26T03:57:58+5:30
येथील हरिगंगा सोसायटीतील खतप्रकल्प नाल्याच्या प्रवाहाला अडथळा करीत असून, त्यामुळे फुगवटा निर्माण होऊन पाण्याचा प्रवाह

खतप्रकल्पाचा नालेप्रवाहाला अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : येथील हरिगंगा सोसायटीतील खतप्रकल्प नाल्याच्या प्रवाहाला अडथळा करीत असून, त्यामुळे फुगवटा निर्माण होऊन पाण्याचा प्रवाह थेट काही घरांमध्ये शिरत आहे. सोसायटीतील इतर घरांमध्ये शिरणारे बॅक वॉटर वाढत्या पावसाच्या प्रवाहामुळे डॉ. आंबेडकर सोसायटीच्या नाल्यात तातडीची गरज म्हणून सोडावे लागले आहे.
दुर्गंधीयुक्त पाणी तात्पुरत्या नाल्यात सोडल्यामुळे सोसायटी मागील घरांना दुर्गंधीसह पाणी नाल्यात तुंबण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने मोठा पाऊस झाल्यास नाल्याच्या परिसरातील राडारोडा आणि माती नाल्यात वाहून जाऊन पुन्हा पाणी येथील घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे. नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये राडारोडा, झाडे-झुडपे तसेच अतिक्रमणे झाल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढल्यास आळंदी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीच्या घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे.
पावसाच्या पाण्याच्या या समस्येवर पावसाळी पाण्याच्या आणि सांडपाण्याच्या योग्य त्या क्षमतेच्या वाहिन्या टाकून नाला चॅनलायझिंग करण्याची गरज आहे. मात्र महापालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे संबंधित गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येवर त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले.
याबाबत येत्या दोन महिन्यांत योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीधर येवलेकर यांनी सांगितले. तर हरिगंगा सोसायटीच्या सांडपाण्यामुळे अहिल्या आणि डॉ. आंबेडकर वसाहतीमधील नागरिकांना होणाऱ्या त्रासाची आम्ही दखल घेतली असून स्वच्छतेचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय लांडगे यांनी दिली.