पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर सुरू असलेली रस्त्यांची कामे वारकरी, भाविकांसाठी अडथळा ठरण्याची शक्यता आहे. विश्रांतवाडीतील मुख्य चौकात सुरू असलेले रस्त्याचे काम आणि दिवेघाटातील कामे पालखी मार्गात अडथळा ठरू शकतात. कामांची पूर्तता पालखी प्रस्थानापूर्वी व्हावी, अशी मागणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीकडून करण्यात आली. त्यानंतर संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून पालखी सोहळ्याचे आगमन हाेण्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
पोलिस आयुक्त कार्यालयात बुधवारी (दि.२१) श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान प्रमुख, पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख डाॅ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संत तुकाराम महाराज संस्थानचे पदाधिकारी जालिंदर मोरे, वैभव मोरे आणि दिलीप मोरे यांची यावेळी उपस्थिती होती. पालखी आगमन, प्रस्थान सोहळा, बंदोबस्त, वाहने लावण्याची व्यवस्था याबाबत बैठकीत चर्चा झाली.
गतवर्षी पालखी आगमन झाल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी होणारी भाविकांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त नेमण्यात यावा, अशी मागणी यावेळी आळंदी संस्थानच्या विश्वस्तांकडून करण्यात आली. शहरात पालखीचे आगमन, प्रस्थान सोहळ्याला होणारी गर्दी विचारात घेऊन पालखी सोहळ्यात बंदोबस्त वाढवण्यात येईल. तसेच ठिकठिकाणी लोखंडी कठडे बांधण्यात येईल. जेणेकरून पालखी सोहळा जलदगतीने मार्गस्थ होईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
पालखी सोहळ्यासोबत दिंड्या असतात. दिंड्यामध्ये वाहनेही असतात. वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच पोलिस आणि पालखी सोहळ्यांच्या विश्वस्तांमध्ये समन्वय साधण्यासाठी व्हॉट्सॲपवर एक ग्रुप करावा. जेणेकरून पोलिस आणि विश्वस्तांमध्ये संवाद साधणे शक्य होईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली.