पुणे: ओबीसी आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या शिंदे समितीचा अहवाल उघड झाला आहे, त्याचवेळी या आरक्षणासाठी भांडणारे ८ लाख कुणबी प्रमाणपत्र दिली गेली असल्याचे सांगत आहेत. असे असेल तर ओबीसी आरक्षण संपल्यात जमा आहे अशी टीका मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको यासाठी भांडणारे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजासाठी खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रा. हाके यांनी राज्य सरकारकडून दिल्या जात असलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर हरकत घेतली. ते म्हणाले, सरकारने नियुक्त केलेल्या शिंदे समितीचा अहवाल उघड झाला आहे. त्यांच्या शिफारसी उघड झाल्या आहेत. भांडणारे नेते पुन्हा मुंबईला निघाले आहेत. मुळ ओबीसी असलेल्यांच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये अशी आमची मागणी आहे व सरकार तर तेच करायला निघाले आहे. ८ लाख प्रमाणपत्र दिली गेली आहेत तर तेवढी आरक्षणे तयार झाली, म्हणजे मुळ जो ओबीसी आरक्षित आहेत, त्यांच्यात हे नवीन आले असेच आहे.
आणखी प्रमाणपत्र दिली जाणार आहे. याचा सरळ अर्थ ओबीसी आरक्षण संपल्यातच जमा आहे. मुळ जे ओबीसी आहेत, त्यांना यात काहीच मिळणार नाही असेच आमचे म्हणणे आहे. त्यांना धक्का न लावता काय द्यायचे ते द्या, आमची काही तक्रार नाही, मात्र त्यांना धक्का लावून तुम्ही या पद्धतीने प्रमाणपत्र वाटणार असाल तर मग मुळच्यांनी काय करावे तेही सांगावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजासाठी याचा जाहीर खुलासा करावा अशी मागणी प्रा. हाके यांनी केली.
कोणाला भावनिक करून ओबीसी आरक्षणात घुसता येईल असे एखाद्याला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. ते मुंबईत उपोषणाला बसले की आम्हीही जिथे आहोत तिथून मुंबईपर्यंत एक लॉँग मार्च काढू. मुंबई जाऊन मुख्यमंत्र्यांना या प्रमाणपत्र वाटपाचा जाब विचारू असा इशाराही यावेळी हाके यांनी दिला.