पॉझिटिव्ह रुग्ण कमी होताच घटले सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:12 IST2021-05-10T04:12:01+5:302021-05-10T04:12:01+5:30
पुणे : शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम जाणवू लागला असून, दररोजच्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली ...

पॉझिटिव्ह रुग्ण कमी होताच घटले सक्रिय रुग्ण
पुणे : शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याचा परिणाम जाणवू लागला असून, दररोजच्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्याच्या परिणामस्वरूप सक्रिय रूग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. शहरात १८ एप्रिल रोजी ५६ हजार ६३६ सक्रिय रुग्ण होते. तर, रविवारी ही संख्या ३३ हजार ७३२ वर आली. मागील २२ दिवसांत तब्बल २२ हजार ९०४ सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत.
शहरातील दुसऱ्या लाटेला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरुवात झाली. मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे शहरात कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. या काळात बेड मिळणेही दुरापास्त झाले होते. राज्य शासनाने कडक निर्बंध आणि संचारबंदी लागू केली होती. पुणे महापालिकेच्या हद्दीतही १५ एप्रिलपासून संचारबंदीला सुरुवात झाली. अत्यावश्यक सेवांना परवानगी दिलेल्या वेळांव्यतिरिक्त अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यामुळे स्वाभाविकच नागरिकांचे बाहेर पडणे बंद झाले.
या काळात मोठ्या प्रमाणावर स्वॅब तपासण्याही करण्यात येत होत्या. साधारणपणे ३० एप्रिलपासून रुग्ण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडाही कमी झाला आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसारण्याचे आशादायक चित्र निर्माण होऊ लागले आहे.
-----
१८ एप्रिल रोजी ५६ हजार ६३६ सक्रिय रुग्ण होते. ३० एप्रिलपर्यंत त्यामध्ये १२ हजार ४३३ रुग्णांची घट झाली. तर १ मे रोजी ४३ हजार २४४ सक्रिय रुग्ण होते. त्यामध्ये ९ मेपर्यंत ९ हजार ५१२ रूग्णांची घट झाली.
-----
तारीख। पॉझिटिव्ह। सक्रिय रुग्ण
३० एप्रिल। ४,११९। ४४,२०३
०१ मे। ४०६९ । ४३२४४
०२ मे। ४०४४। ४०, ९०७
०३ मे। २५७९। ४२,२२९
०४ मे। २८७९। ४०,७९१
०५ मे। ३२६०। ३९,८३९
०६ मे। २९०२। ३९,७३२
०७ मे। २४५१। ३८,४८१
०८ मे। २८३७। ३६,५८६
०९ मे। २०२५। ३३,७३२