खेड वनपरिक्षेत्रात मोरांची संख्या वाढली

By Admin | Updated: March 21, 2016 00:32 IST2016-03-21T00:32:40+5:302016-03-21T00:32:40+5:30

खेड वनपरिक्षेत्रात वनीकरण, वनसंवर्धन आणि जनजागृती यांमुळे वनविषयक चळवळ सकारात्मक वाटचाल करीत आहे. याचे फलित म्हणून परिक्षेत्रात मोरांची संख्या चांगलीच वाढली आहे

The number of peacocks increased in the Khed Forest Territory | खेड वनपरिक्षेत्रात मोरांची संख्या वाढली

खेड वनपरिक्षेत्रात मोरांची संख्या वाढली

राजगुरुनगर : खेड वनपरिक्षेत्रात वनीकरण, वनसंवर्धन आणि जनजागृती यांमुळे वनविषयक चळवळ सकारात्मक वाटचाल करीत आहे. याचे फलित म्हणून परिक्षेत्रात मोरांची संख्या चांगलीच वाढली आहे. तसेच संत तुकाराम वनग्राम पुरस्कारात परिक्षेत्रातील रानमळा आणि दोंदे या दोन गावांनी राज्यात प्रथम, तर मिरजेवाडी गावाने राज्यात द्वितीय पुरस्कार मिळविण्याचा बहुमान २००६ ते २००९ दरम्यान मिळविलेला आहे.
गावोगाव वनसंरक्षण समित्या स्थापण्याचा निर्णय झाल्यानानंतर अनेक गावांनी या क्षेत्रात चांगली कामगिरी नोंदविली आहे. या वन चळवळीमुळे रानमळा, मिरजेवाडी, कमान, सांडभोरवाडी, वाकळवाडी, रेटवडी या गावांमध्ये मोरांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या सर्व गावांच्या वनांमध्ये मोर आता सहजरीत्या दृष्टीस पडत आहेत. वनसंरक्षण समित्यांमुळे जनजागृती होऊन पशू आणि प्राण्यांची हत्या जवळपास थांबली आहे. लोकसहभागातून रोपवने वाढविली जात आहेत. कुऱ्हाडबंदी आणि वनेतर इंधनवापराच्या निर्णयामुळे वनसंरक्षण होत आहे. तसेच वनविभागाच्या मदतीने वनसंवर्धन करण्यात आल्याने दाट वने तयार झाली आहेत. या गावांमध्ये मातीचे बंधारे बांधल्याने वन्य पशूपक्ष्यांना उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाल्याने त्यांची संख्या वाढली. तसेच अनेक गावांनी वनतळी घेतल्याचाही फायदा मोरांना झाला. रानमळा या गावात तर लोक वनसंरक्षण समितीतर्फे धान्य गोळा करून पक्ष्यांसाठी ठिकठिकाणी टाकले जाते. या एकत्रित उपायांमुळे मोरांची संख्या वाढण्यास मदत झाली. खेड परिक्षेत्रातील मिरजेवाडी गावाने २००६-०७ साली संत तुकाराम वनग्राम पुरस्कार मिळविला. या गावाचा जिल्ह्यात पहिला आणि राज्यात दुसरा क्रमांक आला. रानमळा गावाने २००७-०८ साली जिल्ह्यात आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवून संत तुकाराम वनग्राम पुरस्कार पटकाविला. तर दोंदे गावाने २००८-०९ साली जिल्ह्यात व राज्यात प्रथम क्रमांक मिळवत संत तुकाराम वनग्राम पुरस्कारावर आपले नाव कोरले. एकाच तालुक्यातील तीन गावांनी राज्यस्तरावर मिळविलेले हे यश लक्षणीय आहे.

Web Title: The number of peacocks increased in the Khed Forest Territory