आता घुमणार लावणीची छमछम आणि दणाणणार शिट्ट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:27 IST2020-12-13T04:27:19+5:302020-12-13T04:27:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तिसरी घंटा झाली...नाट्यगृहाचा पडदा उघडला...मग तुम्ही येतांय ना! आता आम्ही सज्ज झालो...तुमच्या टाळ्या आणि ...

आता घुमणार लावणीची छमछम आणि दणाणणार शिट्ट्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तिसरी घंटा झाली...नाट्यगृहाचा पडदा उघडला...मग तुम्ही येतांय ना! आता आम्ही सज्ज झालो...तुमच्या टाळ्या आणि शिट्ट़्यांचे आवाज ऐकायला आम्ही आतूर झालो आहोत, हे बोल आहेत लावणी नृत्यांगनांचे. नवीन वर्षात लावणी ‘अनलॉक’ होत आहे.
येत्या २ जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिर येथे लावणीचा दहा महिन्यानंतरचा पहिला प्रयोग होणार आहे. त्यामुळे लावणी कलावंतांमध्ये उत्साह संचारला आहे. “आम्ही चाळ बांधतोय...पण तुम्ही येणार ना,” अशी साद लावणी कलावंतांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना घातली आहे.
मार्च ते मे हा यात्रा-जत्रांचा मौसम तर पावसाळ्यापासून सुरु होणारा गणेशोत्सव, नवरात्र, दसरा ही सणसुद असे दोन्ही हंगाम यंदा कोरोना टाळेबंदीमुळे वाया गेले. फक्त कला हेच उपजिविकेचे साधन असणाऱ्यांवर यामुळे बिकट परिस्थिती ओढवली. मात्र आता नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू झाल्याने कलावंतांना कार्यक्रम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रेक्षकांच्या शिट्ट्या, दाद यासाठी कलाकार आसुसलेले आहेत. प्रेक्षकांनी लावणी कार्यक्रमांना यावे, यासाठी नृत्यांगनांचे व्हिडिओ आयोजकांनी तयार केले आहेत. ‘मायबाप’ प्रेक्षक निराश करणार नाहीत या एका आशेवर पुन्हा पायात घुंगरू बांधणार असल्याचे लावणी नृत्यांगनांनी सांगितले.
चौकट
“मोठ्या खंडानंतर पुन्हा लावण्यांचे कार्यक्रम सुरू होत असल्याचा आनंद झाला आहे. वेगळे काहीतरी देण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही करु. आम्हाला प्रेक्षकांच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. चांगला प्रतिसाद मिळाला की आमचा उत्साह आणखी वाढेल.” -अर्चना जावळेकर, नृत्यांगना
चौकट
“शंभर वर्षांपूर्वीही कलाकारांच्या वाट्याला आले नसतील इतके वाईट दिवस आम्ही लॉकडाऊनमध्ये पाहिले. आता आम्ही रसिकांच्या भेटीला येत आहोत. पारंपारिक लावण्यांबरोबरच बॉलिवुडच्या गाण्यांवर अदाकारी आम्ही सादर करणार आहोत.”
- संगीता लाखे, नृत्यांगना
चौकट
“नाट्यगृहांचा पडदा उघडल्याने आमच्यात नवीन उत्साह संचारला आहे. आम्ही सज्ज आहोत. प्रतीक्षा आहे ती केवळ प्रेक्षकांच्या प्रतिसादाची!”
- माया खुटेगावकर, प्रसिद्ध लावणी नृत्यांगना
---------------------------------------------