आता लक्ष्य पुणे महापालिका
By Admin | Updated: October 19, 2014 22:57 IST2014-10-19T22:57:33+5:302014-10-19T22:57:33+5:30
गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे लोकसभेपाठोपाठ भाजपाला शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत मताधिक्य मिळाले आहे.

आता लक्ष्य पुणे महापालिका
पुणे : गेल्या सहा महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे लोकसभेपाठोपाठ भाजपाला शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांनंतर होणाऱ्या महापालिकेतील निवडणुकीमध्ये पक्षाचा महापौर करण्याचे लक्ष भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविल्याची चर्चा आहे.
पुणे शहरात शिवसेनेबरोबर भाजपने १९९० ला पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत युती केली. त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात युतीचे सत्ता आली. त्या वेळी पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी ३ ठिकाणी शिवसेना व दोन जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतरच्या १९९७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपला अंंदाजे २० जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यानंतर पुन्हा १९९९ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दोन जागा कायम राहून शिवसेनेची तीनपैकी एक जागा कमी झाली. त्यानंतर २००२ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे ३५ नगरसेवक निवडून आले. पण, हळूहळू शिवसेनेची ताकद कमी होत गेली.
दरम्यान, एका बाजूला भाजपची संघटनात्मक ताकद वाढत असताना शिवसेनेची ताकद कमी होत गेली. २००४ विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागा कमी होऊन केवळ गिरीश बापट व विनायक निम्हण हे दोघेच निवडून आले. त्यानंतर शिवसेनेतून फुटून मनसे या वेगळ्या राजकीय पक्षाची स्थापन राज ठाकरे यांनी केली. त्यामुळे शहरातील युतीमध्ये भाजपाचे वजन वाढले. २००९ मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर सहाचे आठ मतदारसंघ झाले. त्या वेळी भाजपाचे शहरातून कसबा व पर्वती असे दोन आणि पोटनिवडणुकीतून खडकवासला एक असे तीन आमदार होते.
२०१२च्या निवडणुकीतही शिवसेनेचे २० वरून १५ नगरसेवक झाल्यानंतरही भाजपचे २५ चे २६ नगरसेवक निवडून आले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले. त्या वेळेपासून देशभर मोदी नावाची लाट सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत देशभर भाजपला २८२ जागा मिळवून एकहाती सत्ता मिळाली. शहरातील आठही मतदारसंघांत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामुळे मोदींची लाट पुणे शहरात पुन्हा एकदा चालल्याचे चर्चा आहे. लोकसभा व विधानसभेत शहरातील सर्व मतदारसंघात निर्विवाद प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीवर भाजपा लक्ष केंद्रित करणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ सुत्राने सांगितले. (प्रतिनिधी)