कॅम्पात आता कारवाई
By Admin | Updated: June 17, 2015 23:43 IST2015-06-17T23:43:27+5:302015-06-17T23:43:27+5:30
शहराचे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी

कॅम्पात आता कारवाई
पिंपरी : शहराचे बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. त्यामुळे तोडगा काढण्यासाठी कठोर कारवाईचे धोरण अवलंबावे लागणार आहे. येत्या २२ जूनपासून रस्त्यावर अडथळा ठरतील अशी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई वाहतूक पोलीस आणि महापालिका यांच्या वतीने राबविण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
वेळोवळी वाहतूक नियोजनाबाबत बैठका होतात; परंतु ठोस तोडगा निघत नाही. वाहतूककोंडी जैसे थे हे चित्र बदलण्यासाठी बुधवारी विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस महापालिका आयुक्त राजीव जाधव, शहर अभियंता महावीर कांबळे, वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त सारंग आवाड, सहायक आयुक्त महेंद्र रोकडे, निरीक्षक राजेंद्र देशमुख, तसेच खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार आणि डब्बू आसवानी, धनराज आसवानी, महेश वाधवानी हे व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिका अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे या भागाचा पाहणी दौरा करावा, सम आणि विषम तारखेला ‘नो पार्किंग’ची ठिकाणे निश्चित करता येतील, त्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, असे या वेळी सर्वांनीच सुचविले. दुकानदार दुकानापुढील जागेत रस्त्यावर अतिक्रमण करतात. दुकानाच्या बाहेर अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन नागरिकांना रस्त्याने ये-जा करणेही कठीण होते. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईस प्राधान्य द्यावे लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महापालिका अधिकाऱ्यांनी सूचना द्याव्यात. काही दुकानदारांनी रस्त्यापर्यंत, पदपथापर्यंत दुकाने वाढविली आहेत. त्यांना २२ जूनच्या आत अतिक्रमण काढून घेण्यास सांगावे. (प्रतिनिधी)
शाळांना सूचना द्या
वाहतूककोंडीत भर पडते ती स्कूल बसची. शैक्षणिक संस्थांच्या स्कूलबस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. शैक्षणिक संस्थांना त्यांची वाहने शाळेच्या वाहनतळावर उभी करण्याची सूचना द्यावी. रस्त्यावरील हातगाड्यांवर कारवाई होत असताना, शैक्षणिक संस्थांच्या वाहनांची त्यांनी योग्य व्यवस्था केली, तर अपघातांचे प्रमाण नियंत्रणात येईल. शिवाय वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.- श्रीरंग बारणे, खासदार
मालवाहू वाहनांना रात्री मुभा द्यावी
पिंपरी बाजारपेठेत मालवाहू वाहने दिवसभर फेऱ्या मारत असतात. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकची भर पडते. वाहतूककोंडी कमी करायची असेल, तर मालवाहू वाहनांना दिवसा बंदी घातली पाहिजे. त्यांना रात्री ९ नंतर मुभा द्यावी, जेणेकरून बाजारपेठेतील वाहतूककोंडीवर नियंत्रण आणणे शक्य होईल. कोंडीमुळे ग्राहकसुद्धा पिंपरी बाजारपेठेकडे पाठ फिरवू लागले आहेत. - गौतम चाबुकस्वार, आमदार