आता संत तुकाराम गाथा तेलुगू भाषेत
By Admin | Updated: January 29, 2017 04:12 IST2017-01-29T04:12:22+5:302017-01-29T04:12:22+5:30
आपल्या अभंगांतून समाजाला दिशा देणाऱ्या श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथेतील अभंगांची तेलुगू भाषकांनाही माहिती मिळणार आहे. सातशे पानांच्या या अभंगगाथेचे तेलुगूत भाषांतर करण्यात आले आहे.

आता संत तुकाराम गाथा तेलुगू भाषेत
पिंपरी : आपल्या अभंगांतून समाजाला दिशा देणाऱ्या श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथेतील अभंगांची तेलुगू भाषकांनाही माहिती मिळणार आहे. सातशे पानांच्या या अभंगगाथेचे तेलुगूत भाषांतर करण्यात आले आहे.
श्री संत तुकाराममहाराजांच्या गाथेत चार हजार ९२ अभंग आहेत. या अभंगांच्या माध्यमातून समाजाला एक दिशा मिळते. वारकरी संप्रदायात गाथेला मोठे महत्त्व आहे. मात्र, गाथेतील मराठी भाषेतील अभंग वाचणे इतर भाषिक भाविकांना शक्य होत नाही. अभंगरुपी विचार इतरांपर्यंतही पोहोचायला हवेत. यासाठी गाथेचे भाषांतर करण्यात आले आहे. सर्व अभंग तेलुगू भाषेत भाषांतरीत करण्यात आले आहेत.
तुकोबारायांचे विचार गाथेच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचत आहेत. सध्याच्या तुकोबारायांच्या गाथेचे राज्यासह परराज्यातही ठिकठिकाणी पारायण होत असते. या पारायणासाठी इतर भाषिक भाविकांचाही समावेश आहे. अशाच प्रकारे तेलंगणातील सुमारे पाचशे भाविक दर वर्षी मावळ तालुक्यातील भंडारा डोंगरावर गाथा पारायण करतात. मात्र, त्यांना भाषेची अडचण होती. तेलुगू भाषेतील गाथेने ही अडचण दूर झाली आहे.(प्रतिनिधी)
भाविकांना पारायणासाठी सोयीस्कर
कर्णे गजेंद्र भारती महाराज, नारायणखेडकर महाराज, अवधूत महाराज एकंदेकर, ज्ञानेश्वरमहाराज एकंदेकर यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत गाथेचे भाषांतर केले आहे. तेलंगणा राज्यातील संगार्डी जिल्ह्यात श्री गजेंद्र आश्रम असून याच्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथेही आश्रम आहेत. गजेंद्र आश्रमाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पारायण होत असते. तुकोबारायांच्या विचारांची इतरांनीही माहिती मिळावी, यासाठी गाथेचे भाषांतर करण्यात आले आहे. अभ्यासासाठी आणि पारायणासाठी आता तेलुगू भाषेतील गाथाही उपलब्ध झाल्याने भाविकांना सोयीचे झाले आहे.
श्री संत तुकाराम महाराजांची गाथा मराठी भाषेत आहे. तेलुगू भाषिक-भाविकांना पारायण करायचे असल्यास अडचण निर्माण होत होती. त्यासाठी तेलुगू भाषेत गाथेचे भाषांतर केले आहे. अनेक दिवस हे काम सुरु होते.
- अवधूतमहाराज एकंदेकर