मंचरला ‘चला आता लढायचं...’
By Admin | Updated: January 14, 2017 03:02 IST2017-01-14T03:02:36+5:302017-01-14T03:02:36+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने

मंचरला ‘चला आता लढायचं...’
मंचर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ‘निर्भयकन्या अभियानां’तर्गत आवटे महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी ‘चला आता लढायचं’ हे पथनाट्य मंचरमधील विविध सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणी सादर केले. याला दर्शकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
सदर पथनाट्याच्या सादरीकरणासमयी महिला सबलीकरणासंबंधी बोलताना प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले, की आज स्त्री संघटन ही काळाची गरज आहे. त्यांच्या एकत्रित येण्याने सबलीकरणाचा मार्ग अधिक सुकर बनत जाईल आणि निश्चितच ती प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकेल. यासाठी अशा पथनाट्याद्वारे थेट समाजापर्यंत महिला सबलीकरणाचा विषय घेऊन जायला हवा. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. संजय पोकळे, पोलीस निरीक्षक भागवत मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक बंडोपंत घाटगे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड आदी उपस्थित होते. पोलीस मित्रदलाची मदत मिळविण्यासाठी प्रतिसाद अॅप कसे महत्त्वाचे आहे, याविषयी माहिती व प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. हे पथनाट्य ३० स्वयंसेवकांनी सादर केले