आता सर्वस्व मायबाप प्रेक्षकांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:10 IST2020-12-08T04:10:51+5:302020-12-08T04:10:51+5:30
पडद्यामागच्या कलाकारांचे बोल कलाकारांचे आर्जव : निर्माते जगले तर आम्ही जगू लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊन काळात नाटय ...

आता सर्वस्व मायबाप प्रेक्षकांच्या हाती
पडद्यामागच्या कलाकारांचे बोल
कलाकारांचे आर्जव : निर्माते जगले तर आम्ही जगू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊन काळात नाटय व्यवहार पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे पडद्यामागच्या कलाकारांनी व्यवसायाचा वेगळा पर्याय स्वीकारत जगण्याचा नवा मार्ग निवडला. आता नऊ महिन्यांनंतर नाट्यगृहे सुरू झाली असून, नाटक देखील ’अनलॉक’ झाले आहे. येत्या १२ डिसेंबरपासून नाटकांचा हंगाम सुरू होत आहे. मल्टिप्लेक्स खुली झाल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद रोडावला असे होऊ नये....हे आता सर्वस्वी प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. निर्माता जगला तरच आम्ही कलाकार जगणार आहोत...अशी प्रतिक्रिया आहे पडद्यामागील कलाकारांची.
नऊ महिन्यांनंतर नाटकांचे पुनश्च हरीओम झाले आहे. बहुतांश नाटकांचा श्रीगणेशा पुण्यातूनच होत आहे. त्यामुळे प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत संयोजन, वेशभूषा, रंगभूषा, संवाद लेखन... अशी नाटकाच्या पडद्यामागे राहून महत्त्वाची कामे करणाऱ्या कलाकारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लॉकडाऊनमधील बिकट परिस्थितीमुळे पडद्यामागच्या कलाकारांनी कुणी भाजी विक्री, कुणी प्लंबिग, गवंडी तर कुणी वॉचमन काम स्वीकारले. आता नाटक सुरू झाले असले तरी प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि निर्मात्यांकडून मिळणारे मानधन यावर कामाचे भवितव्य अवलंबून असल्याचे माळवदकर म्हणाले.
-----------------------------------------------
नाटक व्यवसायात पडद्यामागे काम करणारे जवळपास १०० कलाकार आहेत. नाटकांचे प्रयोग सुरू झाल्याने त्यातील १५ ते २० कलाकारांना काम मिळाले आहे. व्यावसायिक नाटकांसाठी नाट्य निर्मात्यांचा पडद्यामागील कलाकारांचा ठरलेला ग्रुप असतो. त्यांना नाटकाबद्दल माहिती असल्याने त्यांनाच पडद्यामागील कामे दिली जातात. कोरोनामुळे पूर्वीसारखा मोबदला मिळेलच असे नाही. निर्माता जगला तरच आम्ही कलाकार जगू.
- सुरेंद्र गोखले, अध्यक्ष, रंगभूमी सेवा संघ
-----------------------------------------------
गेल्या नऊ महिन्यांपासून हाताला काम नव्हते. छोटी मोठी कामे करीत इतके दिवस काढले. व्यावसायिक नाटकांचे प्रयोग पुन्हा सुरु झाल्याने काम मिळू लागले आहे. मुंबईत दोन नाटकांसाठी नेपथ्य केले. अजूनही कामाचा मोबदला मिळालेला नाही. नाटके सुरू झाली तरी अजूनही साशंकता आहे. - रवी पाटील, नेपथ्यकार
---------------------------------------------