आता उत्सुकता मतदारांना अन् उमेदवारांनाही
By Admin | Updated: February 23, 2017 03:42 IST2017-02-23T03:42:43+5:302017-02-23T03:42:43+5:30
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांच्या गुरुवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला

आता उत्सुकता मतदारांना अन् उमेदवारांनाही
पुणे : पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांच्या गुरुवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होत असून, पहिला निकाल दोन तासांत लागण्याची शक्यता आहे़ शहरातील विविध १४ क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात ही मतमोजणी होत असून, मतमोजणीसाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे़ या १४ ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी मतमोजणीची रंगीत तालीम घेतली असून, कर्मचाऱ्यांना मतमोजणी कशी करायची, उमेदवारांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम मशिनवरील मते कशा पद्धतीने दाखवायची याचे प्रशिक्षण दिले़ प्रत्येक ठिकाणी एकावेळी एका प्रभागाची मतमोजणी करण्यात येणार असून, पहिला प्रभाग संपल्यानंतर दुसरा व त्यानंतर तिसऱ्या प्रभागाची मतमोजणी करण्यात येणार आहे़ त्यामुळे संपूर्ण निकाल हाती येण्यास सायंकाळ होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे़
प्रभाग एकपासून होणार सुरुवात
पुणे: येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक १, २ आणि ६ मधून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची मोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाचे गोडाऊन (एफसीआय गोडाऊन) क्रमांक ८ मध्ये केली जाणार आहे.
मत मोजणीसाठी २१ टेबल ठेवण्यात आले असून, प्रत्येक टेबलवर मत मोजणीसाठी ३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, असे येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले.
कळस-धानोरी, फुलेनगर- नागपूर चाळ आणि येरवडा भागातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदारांनी दिलेल्या मतदानाच्या माध्यमातून ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले. येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २६८ मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक १, २ आणि ६ मध्ये सुमारे ५५ टक्के मतदान झाले. आता उमेदवारांच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मतमोजणीच्या कामास सुरुवात केली जाणार आहे.
देशमुख म्हणाले, मतदानाची मोजणी शांततेच्या वातावरणात व्हावी, या उद्देशाने आवश्यक बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रथमत: प्रभाग क्रमांक १च्या मतमोजणीचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर प्रभाग क्रमांक २ ची मतमोजणी सुरू केली जाईल. प्रभाग क्रमांक २ चा निकाल जाहीर केल्यानंतर प्रभाग क्रमांक ६ च्या मतमोजणीचे काम हाती घेतले जाईल. उमेदवारांच्या प्रतिनिधींना सुद्धा मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी ४०० ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असणाऱ्या व्यक्तींनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. १०० हून अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मतमोजणीला होणार उशीर
वारजे : वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग १३, ३१ व ३२ च्या मतमोजणीस चार उमेदवारांच्या प्रभागनिहाय मोजणीमुळे उशीर होणार असल्याचे वारजे-कर्वेनगरच्या निवडणूक निर्णय अधिकारी नंदिनी आवाडे यांनी स्पष्ट केले.
सर्वांत आधी प्रभाग १३ ची मोजणी होणार असल्याने त्याचा निकाल साधारण दुपारी एक वाजता, तर प्रभाग ३२ चा निकाल सर्वांत शेवटी म्हणजे साधारण रात्री आठ वाजेपर्यंत लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तीनही प्रभागांच्या मतमोजणीस गुरुवारी सकाळी दहा वाजता पंडित दीनदयाळ शाळा, एरंडवणा येथे सुरुवात होणार आहे. एका प्रभागासाठी मतमोजणीच्या सहा फेऱ्या (राऊंड) होणार आहेत. तीन प्रभागासाठी अशा १८ फेऱ्या होतील. साधारणपणे एका फेरीस २० ते २५ मिनिटे लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार एका प्रभागासाठी साधारणपणे अडीच ते तीन तास वेळ लागेल. दीनदयाळ शाळेच्या बाहेरील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. या वेळी क्षेत्रीय अधिकारी गणेश सोनुने, पोलीस निरीक्षक अनुजा देशमाने, बीजी मिसाळ व रेहाना शेख, तसेच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (वार्ताहर)
बारा वाजेपर्यंत लागणार पहिला कौल
पुणे : टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या जनता वसाहत-दत्तवाडी (३०), वडगाव बु.-धायरी (३३) आणि हिंगणे खुर्द-सनसिटी (३४) या तीन प्रभागांची मतमोजणी स.प. महाविद्यालयामध्ये होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे. साधारणपणे सहा वाजेपर्यंत तीनही प्रभागांचे चित्र स्पष्ट होईल.
महाविद्यालयातील पटवर्धन सभागृहामध्ये तीनही प्रभागांच्या मतमोजणीसाठी बुधवारी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन नियोजनाची माहिती दिली. तीन प्रभागांच्या मतमोजणीसाठी एकूण २० टेबल ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर एका पर्यवेक्षकासह तिघांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रभाग ३० मध्ये एकूण ७५ मतदान केंद्रे आहेत. त्यानुसार मतमोजणीच्या चार फेऱ्या घेण्यात येतील. त्यामुळे या प्रभागाचा निकाल बारा वाजेपर्यंत अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रभागात एकूण २३ उमेदवार आहेत.
प्रभाग ३३ मध्ये ७९ केंद्रे असून, चार फेऱ्यांमध्येच मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रभागात एकूण २१ उमेदवार असल्याने मतमोजणीला तुलनेने कमी वेळ लागणार आहे. तर प्रभाग ३४ मध्ये सर्वाधिक २४ उमेदवार आणि ८३ केंदे्र असल्याने मतमोजणीचा कालावधी वाढणार आहे. या प्रभागाची मोजणी पाच फेऱ्यांपर्यंत चालणार असून, अडीच ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो. (प्रतिनिधी)
पहिला निकाल अडीच तासांत
पुणे : धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग ३८ पासून गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून, निकाल हाती येण्यास दोन ते अडीच तासांचा वेळ लागेल. त्यानंतर अनुक्रमे ३९ आणि ४० प्रभागाची मतमोजणी होईल.
धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या तीन प्रभागांमधून २४३ मतदान केंद्रांवर मतदान झाले. प्रत्येक प्रभागात सरासरी १८ ते २२ उमेदवार होते. या उमेदवारांचे भवितव्य आज निश्चित होणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबल ठेवण्यात आले असून, १५वा टेबल टपाली मतदानासाठी असेल. प्रभाग क्रमांक ३८ या राजीव गांधी-बालाजीनगर आणि ४० या आंबेगाव-दत्तनगर-कात्रज गावठाण या प्रभागासाठी प्रत्येकी ७, तर धनकवडी-आंबेगाव पठार या ३९ प्रभागाच्या ५ फेऱ्या होतील. विजयी उमेदवारांची माहिती निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून आॅनलाईन प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर विजयी उमेदवारांना त्याची अधिकृत प्रत देण्यात येईल.
विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास व गुलाल उडविण्यास बंदी राहील, अशी माहिती धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली. येथे बंदोबस्तासाठी चार पोलीस निरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच पोलीस कर्मचारी तैनात असतील. (प्रतिनिधी)
आठ तास लागण्याची शक्यता
पुणे : कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.१०, ११ व १२ च्या मतमोजणीस सकाळी दहा वाजता प्रारंभ होणार असून, ही मोजणी प्रभागनिहाय केली जाणार आहे. एका प्रभागाची मोजणी पूर्ण होण्यास किमान अडीच तासांचा कालावधी लागणार असल्याने संपूर्ण मतमोजणीस अंदाजे आठ तास लागण्याची शक्यता क्षेत्रीय सहआयुक्त जयंत भोसेकर यांनी व्यक्त केली आहे.
या तीन प्रभागांमधील ५८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले असून, उद्याच्या ( गुरुवारी) निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाने तीन प्रभागाच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. एमआयटी शाळेमध्ये ही मतमोजणी होणार असून, जवळपास १०० कर्मचारी केंद्रावर तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी १४ टेबल ठेवण्यात येणार आहेत, तर एक टेबल टपाली मतदानासाठी मांडण्यात येणार आहे. डाव्या बाजूला ८ आणि उजव्या बाजूला ७ अशी त्यांची मांडणी आहे. सर्वप्रथम प्रभाग क्र. १० च्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. टपाली मतमोजणीची सीलबंद पेटी उघडून मतांचे विभाजन करून प्रभागनिहाय मतमोजणीदरम्यानच ते घोषित केले जाणार आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवाराला मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक टेबलनुसार १४ प्रतिनिधी आणण्याची परवानगी दिली आहे. मात्र, उमेदवारांची संख्या जास्त असल्याने एका पक्षाच्या चार उमेदवारांनी मिळून १४ प्रतिनिधी आणावेत, अशा सूचना पक्षांच्या उमेदवारांना करण्यात आल्या आहेत, मात्र त्यांच्यावर तशी कोणतीही सक्ती नाही. तिन्ही प्रभागांची मतमोजणी कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, मात्र संपूर्ण निकाल
हाती येण्यास ८ वाजतील, असे त्यांनी
सांगितले. (वार्ताहर)
पहिला राउंड दुपारी एकपर्यंत
पुणे : घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या ७, १४ आणि १६ या तीन प्रभागांत मिळून एकूण १०० उमेदवार असल्याने संपूर्ण निकाल लागण्यास उशीर होण्याची शक्यता असून, प्रभाग क्रमांक ७चा निकाल दुपारी २ पर्यंत अपेक्षित आहे़ घोले रोड क्षेत्रीय कार्यालयातील तीनही प्रभागांची मतमोजणी बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल येथे होणार आहे़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बुधवारी मतमोजणीची रंगीत तालीम घेतली़
प्रभाग क्रमांक ७ मधील चारही गटांत मिळून ३७ उमेदवार आहेत़ या प्रभागात एकूण ७६ हजार ७२७ मतदारांपैकी २० हजार ९२७ स्त्रिया आणि २१ हजार ७४७ पुरुष असे एकूण ४२ हजार ६७४ (५५़६२) जणांनी मतदान केले आहे़ या प्रभागात मतमोजणीसाठी २० टेबल असणार आहेत़ त्यामुळे पहिला राऊंड पूर्ण होण्यास एक तास लागण्याची शक्यता आहे़ एकूण ६ राऊंड होणार आहेत.प्रभाग क्रमांक ७ ची मतमोजणी पूर्ण झाल्यावर प्रभाग क्रमांक १४ ची मतमोजणी सुरू होणार आहे़
प्रभाग क्रमांक १४ मॉडेल कॉलनी, डेक्कन जिमखानामध्ये एकूण ३३ उमेदवार असून, या प्रभागात एकूण ८२ हजार ९०५ मतदार होते़ त्यापैकी २१ हजार ९९४ स्त्रिया आणि २२ हजार ६२१ पुरुष असे मिळून ४४ हजार ६१५ (५३़८१ टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला़ येथे ११० मतदान केंद्रे असून, सहा फेऱ्या होणार आहेत़
सर्वांत शेवटी प्रभाग क्रमांक १६ कसबा पेठ-सोमवार पेठची मतमोजणी होणार आहे़ ६० हजार ५५० मतदार असून, त्यापैकी १८ हजार ११ स्त्रिया आणि १९ हजार ६३३ पुरुष असे ३७ हजार ६४४ (६२़१७) मतदारांनी आपला हक्क बजावला़ या प्रभागात ८० मतदान केंद्रे असून, येथे चार फेऱ्या होणार आहेत़ (प्रतिनिधी)