आता कृषी विद्यापीठातही गोसंवर्धन केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:17 IST2021-02-23T04:17:03+5:302021-02-23T04:17:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राहुरी कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संवर्धन व संशोधन केंद्राला राज्य कृषी परिषदेत सोमवारी मान्यता ...

आता कृषी विद्यापीठातही गोसंवर्धन केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राहुरी कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संवर्धन व संशोधन केंद्राला राज्य कृषी परिषदेत सोमवारी मान्यता दिली. हे केंद्र पुण्यात असणार आहे. याशिवाय जलव्यवस्थापन व हवामान बदल अशा दोन केंद्रांनाही मान्यता देण्यात आली.
कृषी महाविद्यालयात कृषिमंत्री दादा भुसे व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी ही परिषद झाली. परभणी व राहुरी कृषी विद्यापीठाचे डॉ. ढवण, कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. संजय सावंत, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. दिलीप भाले, कृषी परिषदेचे महासंचालन विश्वजित माने, शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर तसेच कृषी विभागातील अधिकारी परिषदेला उपस्थित होते.
चारही कृषी विद्यापीठांमधील विविध संशोधन प्रकल्पांवर या वेळी चर्चा झाली. देशी गायीला ग्रामीण शेती व्यवहारात बरेच महत्त्व आहे. ते लक्षात घेऊन राहुरी कृषी विद्यापीठाला पुण्यामध्ये त्यांचे देशी गाय संवर्धन व संशोधन केंद्र सुरू करण्याला मान्यता दिली. त्याचबरोबर मागील काही वर्षे हवामानात बरेच बदल होत आहे. त्याचा शेतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे हवामान बदल अध्ययन संशोधन केंद्र सुरू करण्यास परभणी कृषी विद्यापीठाला मान्यता देण्यात आली.
राहुरीतच हवामानावर आधारित कृषी व जलव्यवस्थापनाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासही संमती दिली. याच ठिकाणी हंगेरीतील देब्रीज विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार करून सेंद्रिय शेती व पीक तंत्रज्ञान यावर आधारित पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही सुरू करणार आहे. चारही कृषी विद्यापीठांमधील संशोधन प्रस्तावांवर परिषदेत चर्चा झाली. त्यात विद्यार्थी संशोधकांनी तयार केलेल्या प्रस्तावांचाही समावेश आहे. या प्रस्तावांच्या शिफारसी आता राज्य सरकारकडे करण्यात येतील व त्यांच्या अंतिम मान्यतेनंतर हे निर्णय अमलात येतील.