गौण खनिज उत्खनन करणा-यांना नोटिसा
By Admin | Updated: January 16, 2015 23:56 IST2015-01-16T23:56:38+5:302015-01-16T23:56:38+5:30
अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी कोट्यवधी दंड वसुलीबाबतच्या नोटिसा बजावल्या असून

गौण खनिज उत्खनन करणा-यांना नोटिसा
राजगुरुनगर : अनधिकृत गौण खनिज उत्खननप्रकरणी खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी कोट्यवधी दंड वसुलीबाबतच्या नोटिसा बजावल्या असून, दंड न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
महाळुंगे, कुरुळी, सोळू, गोलेगाव, आंबेठाण इत्यादी गावांच्या हद्दीत मुरूम, वाळू अशा गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन केल्याबद्दल या नोटिसा दिल्या आहेत.
हे उत्खनन करणाऱ्यांमध्ये अनेक बड्या हस्ती आणि राजकीय लागेबांधे असलेल्या व्यक्ती आहेत. अनेक वर्षांपासून ही कारवाई प्रलंबित होती. ‘लोकमत’ने याबाबत बातम्याही केल्या होत्या. 'इनरकॉन' कंपनीलाही अशी नोटीस देण्यात आली आहे.
वाढत्या उद्योगांसाठी आणि बांधकामांसाठी खेड तालुक्यात सर्रास टेकड्या फोडून खुलेआम मुरूम काढला जात आहे. प्रशासनाला याची पूर्ण कल्पना असूनही ठोस कारवाई केली जात नाही. तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला मुरूम उत्खनन चालू असताना प्रशासन मख्ख बसलेले असते. उत्खननाची प्रक्रिया चालू असताना या लोकांना कोणीही रोखत नाही. नंतर नोटिसा काढून दंड आकारणी केली जाते. पण अद्यापही किरकोळ अपवाद वगळता कोणीही दंड भरणा केलेला नाही. उलट या कारवाईला आव्हान देऊन वेळकाढूपणा केला जातो. दंड न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई करता येते,मात्र अद्याप कोणावरही अशी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. (वार्ताहर)