डीपी समितीच्या सदस्यांना नोटीस
By Admin | Updated: September 24, 2014 06:09 IST2014-09-24T06:09:16+5:302014-09-24T06:09:16+5:30
शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरील नागरिकांच्या हरकती-सूचनांवर सुनावणी सुरू आहे.

डीपी समितीच्या सदस्यांना नोटीस
पुणे : शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावरील नागरिकांच्या हरकती-सूचनांवर सुनावणी सुरू आहे. त्याकाळात नियोजन समितीचे सदस्य सारंग यादवाडकर व सचिन पुणेकर यांनी काही नकाशे पालिकेच्या सोर्स संगणकावरून परस्पर कॉपी केले. त्यामुळे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे. त्यावर खुलासा केल्यानंतरही महापालिकेकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. उलट सर्व नकाशे जनतेसाठी खुले केले पाहिजेत, असे समिती सदस्यांचे म्हणणे आहे.
शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातील नागरिकांच्या हरकती व सूचनांच्या सुनावनीसाठी शासनाने चार सदस्यांची नियुक्ती केली. त्यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ म्हणून शासनाने यादवाडकर व पुणेकर यांची नियुक्ती केली होती. संंबंधित सदस्यांना महापालिकेने सर्व माहिती व कागदपत्रे दिली होती. त्यानंतरही दोन सदस्यांनी महापालिकेची बौद्धिक संपत्ती असलेल्या सॉफ्टवेअरचे नकाशे परस्पर कॉपी करून घेतले. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा २०००चे कलम ४३ व ६६ अन्वये बेकायदा असून, त्यानुसार आपल्यावर कारवाई का करू नये, अशी नोटीस प्रशांत वाघमारे यांनी बजावली आहे.
त्यावर यादवाडकर म्हणाले, ‘‘समिती सदस्य असल्याने सुनावणीसाठी सर्व नकाशांची मागणी केली. परंतु, सूक्ष्म नकाशे उपलब्ध करून दिले नाहीत. पालिकेच्या वेबसाइटवरील नकाशे अस्पष्ट आहेत. त्यामुळे पालिकेच्या संगणकावरून संबंधित नकाशे कॉपी करून सुनावणीच्या माहितीसाठी घेतले आहेत. ते जनतेलाही खुले करणे अपेक्षित आहे. असे असताना आम्हाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा खुलासा केला आहे. परंतु, त्यावर कोणतेही उत्तर मिळालेले नाही. ’’ (प्रतिनिधी)