नॅचरोपॅथी अभ्यासक्रम नव्हे, मसाज केंद्र!
By Admin | Updated: November 4, 2015 04:10 IST2015-11-04T04:10:36+5:302015-11-04T04:10:36+5:30
पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ नॅचरोपथी’ या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या नॅचरोपॅथीच्या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे शोषण होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

नॅचरोपॅथी अभ्यासक्रम नव्हे, मसाज केंद्र!
पुणे : पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूूट आॅफ नॅचरोपथी’ या संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या नॅचरोपॅथीच्या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे शोषण होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. अभ्यासक्रमांतर्गत ‘मसाज’ हा विषय असून, संस्थेत उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांना मसाज करण्याचे काम विद्यार्थ्यांना करायला लावले जात आहे. यामध्ये रोज २०० रुग्णांचा मसाज करायला लावला जातो.
दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स असून, पहिल्या वर्षासाठी ५, तर दुसऱ्या वर्षासाठी ६ विषय अभ्यासण्यासाठी आहेत. त्यातील जवळपास प्रत्येक विषयाला प्रात्यक्षिक असून, केवळ ‘मसाज’ या एकाच विषयाचे प्रात्यक्षिक दररोज ६ तास जबरदस्तीने करून घेतले जात आहे. याबरोबरच येथील प्राध्यापक विद्यार्थ्यांशी अतिशय वाईट पद्धतीने वागतात; तसेच विद्यार्थिनींना महाविद्यालयाची साफसफाईही करायला लावली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
‘नर्सिंग डिप्लोमा इन नॅचरोपथी अँड योग थेरपी’ या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमाचा भाग आहे, असे सांगून हे शिफ्टमध्ये हे काम करून घेतले जाते. दुसऱ्या वर्षाचे महाविद्यालय जूनमध्ये सुरू होणे अपेक्षित असताना, मसाजच्या कामासाठी प्रात्यक्षिकाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मार्च महिन्यापासूनच बोलवून घेतले. अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा वापर करून संस्था अर्थार्जन करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. यंदा दुसऱ्या वर्षासाठी ३० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यातील १२ विद्यार्थिनी आहेत. यासंबंधी संस्थेच्या संचालिका डॉ. के. सत्यलक्ष्मी यांना संपर्क केला असता, त्या बाहेरगावी असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे संस्थेतील विद्यार्थ्यांच्या शोषणाविरुद्ध आंदोलन करण्यात आले. याशिवाय या अभ्यासक्रमाला सरकारी मान्यतादेखील नाही. भारताच्या कानाकोपऱ्यातून उत्तम शिक्षणाची अपेक्षा घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांचे शोषण या संस्थेतर्फे चालू आहे, ते त्वरित थांबवावे, अशी मागणी अभाविपने केली. याप्रसंगी संचालकांना निवेदन देण्यात आले. योग्य ती कार्यवाही न झाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशाराही अभाविपने दिला.
विद्यार्थ्यांनी केलेला आरोप खोटा असून, मसाजचे काम हे अभ्यासक्रमातील भाग आहे. अशाप्रकारे ६ तास मसाजचे काम करून घेतले जात नाही, तर अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एक तास मसाजचे प्रात्यक्षिक करावे लागते.
- के. सुभाष,
व्यवस्थापकीय अधिकारी
दुसऱ्या वर्षाला एकूण ६ विषय असून, त्यातील एकाच विषयाचे प्रात्यक्षिक सातत्याने घेण्यामागे संस्थेचा नक्कीच स्वार्थ आहे आणि आमची पिळवणूक केली जात आहे. या कामासाठी आम्हाला काही कारणाने सुटी हवी असल्यास, ती मिळत नाही. सुटी घेतल्यास विद्यावेतनातील पैसे कापतात.
- द्वितीय वर्ष विद्यार्थी