डिझेल भरण्यासाठी नाही ‘दमडी-कवडी’
By Admin | Updated: July 14, 2014 04:54 IST2014-07-14T04:54:01+5:302014-07-14T04:54:01+5:30
कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत ज्या नाही त्या गोष्टीत आखडता हात घेणाऱ्या पीएमपीकडे आता डिझेल भरण्यासाठीही ‘दमडी’ नाही, यामुळे अक्षरश: बसगाड्याच बंद ठेवण्याची वेळ कंपनीवर आली आहे.

डिझेल भरण्यासाठी नाही ‘दमडी-कवडी’
पिंपरी : कंपनी तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत ज्या नाही त्या गोष्टीत आखडता हात घेणाऱ्या पीएमपीकडे आता डिझेल भरण्यासाठीही ‘दमडी’ नाही, यामुळे अक्षरश: बसगाड्याच बंद ठेवण्याची वेळ कंपनीवर आली आहे.
मार्गावर धावणाऱ्या बसला लागणारे इंधन व दुरुस्ती याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी आर्थिक नियोजनही महत्त्वाचे असताना कंपनीकडून त्याकडेच दुर्लक्ष केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणावरून गेल्या आठवड्याभरात तीनवेळा निगडीतील भक्ती-शक्ती आगारातून सुटणाऱ्या विविध मार्गावरील बसगाड्या बंद ठेवण्यात आल्या. ‘आला दिवस ढकलायचा’ असाच पीएमपीचा उद्योग सुरू आहे.
भक्ती-शक्ती आगारात १७९ बस आहेत. यापैकी ९६ बस डिझेलवर आहेत. या बसमध्ये निगडीतील एका खासगी पेट्रोलपंपावरून डिझेल भरले जाते. मात्र, डिझेलचे १३ लाखांचे बिल थकल्याने पेट्रोलपंप मालकाने शनिवारी डिझेल भरण्यास नकार दिला. यामुळे आगारातून ३० मार्गांवर सुटणाऱ्या डिझेलवरील २१ गाड्या बंद ठेवल्या होत्या.
काही मार्गावर एक-दोन तासाने एखादी बस येत होती. त्यामुळे या बसेसना प्रचंड गर्दी झाली. प्रवाशांना खासगी वाहनांचा वापर करावा लागला. त्यातच पावसाचीही रिपरिप सुरू असल्याने प्रवाशांचे आणखीणच हाल झाले.
तोट्यात असल्याचे कारण पुढे करीत सर्वच गोष्टीत वेळ मारुन नेणाऱ्या पीएमपीने डिझेल भरण्यासाठी पैसे देण्यासही ‘हात वर’ केले आहेत. डिझेलअभावी बस धावत नसून, यामुळे प्रवाशांचे तर हाल होतात.
डिझेलचे थकित बिल न दिल्याने पेट्रोलपंप मालकाने डिझेल दिले नाही. यामुळे मार्गांवर बस सोडता आल्या नाहीत. तरीही अगोदरचे डिझेल असलेल्या काही बस मार्गावर सोडल्या.
मात्र, ते डिझेल अपुरे पडल्याने काही बस रस्त्यातच बंद पडण्याच्या घटना घडल्या. थकित बिल अदा करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यांची चर्चा झाली असून लवकरच डिझेल उपलब्ध होईल, असे आगार अभियंता गोपीचंद सावंत यांनी सांगितले.(प्रतिनिधी)