धरणफुटीचा नव्हे; अतिक्रमणांचा धोका
By Admin | Updated: July 12, 2015 01:37 IST2015-07-12T01:37:18+5:302015-07-12T01:37:18+5:30
तब्बल ५४ वर्षापूर्वी पानशेत धरण फुटीमुळे शहरात आलेल्या जलप्रलयाने ऐतिहासिक पुण्याचा चेहरामोहरचा बदलून टाकला. या घटनेस आज ५४ वर्षे पूर्ण होताना

धरणफुटीचा नव्हे; अतिक्रमणांचा धोका
पुणे : तब्बल ५४ वर्षापूर्वी पानशेत धरण फुटीमुळे शहरात आलेल्या जलप्रलयाने ऐतिहासिक पुण्याचा चेहरामोहरचा बदलून टाकला. या घटनेस आज ५४ वर्षे पूर्ण होताना, आता पुन्हा शहराला धरण फुटीचा धोका नसला, तरी मुठा नदीत झालेल्या बेसुमार अतिक्रमाणांमुळे शहरावर दरवर्षीच पुराचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेकडो कुटूंबे उध्वस्त तर होतच आहेत. शिवाय दरवर्षी लाखो रुपयांच्या नुकसानीबरोबर पर्यावरणाचीही बेसुमार हानी होत आहे.
या अतिक्रमणांमुळे नदीचे पात्र इतके अरूंद झाले आहे, की १९९७ मध्ये ९० हजार क्युसेक पाणी खडकवासला धरणातून नदीत सोडण्यात आल्यानंतर शहरात पूरस्थिती उद्भवली होती. आता हाच आकडा नदीची वहन क्षमता अतिक्रमणांंमुळे घटली असून गेल्या १८ वर्षात अवघ्या ५० हजार क्युसेकवर पोहचला आहे.
मुठा नदीच्या दोन्ही बाजूला शहर वाढत गेले आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजूस राजरोसपणे अतिक्रमणे होत असून पालिका प्रशासन तसेच पाटबंधारे विभागाचेही अतिक्रमणांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
वहन क्षमता ४० हजार क्यूसेक्सने घटली
पानशेत धरणफुटीनंतर धरणांच्या सुरक्षेबाबत विशेष उपाययोजना केल्या जात असल्याने भविष्यात अशी घटना घटने शक्य नसले तरी, शहरात आता पूर नेहमीचाच होणार असल्याचे चित्र आहे. खडकवासला धरणाची विसर्ग क्षमता 1 लाख 28 हजार क्यूसेक्सची आहे. पानशेत दुर्घटनेनंतर 1997 मध्ये खडकवासला धरणातून सर्वाधिक 90 हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी पुन्हा पावसाचे पाणी शहरात घुसले होते. त्यानंतर 2005 मध्ये 60 हजार क्यूसेक्सलाच पूरस्थिती उद्भवली, पुढे 2009 ला 45 हजार क्यूसेक्लाच शहरात अनेक ठिकाणी पाणी घुसले, तर 2011 मध्येही 50 हजार क्यूसेक्सालच अनेक भागात पाणी घुसले होते.
नदी बनली अतिक्रमणांचे माहेरघर
गेल्या दोन दशकात शहराच्या मध्यातून वाहनारी मुठा नदी अतिक्रमणांच माहेरघर बनली आहे. त्यात बांधकाम व्यावसायिकांसह महापालिका आणि नदीकाठावर असलेल्या ग्रामपंचायतींचाही तितकाच वाट आहे. गेल्या दिड दशकात नदी काठच्या परिसरात बेसुमार बांधकामे झाली असून या बांधकामांसाठी माती आणि राडारोडा टाकून नदीपात्रच गिळंकृत करण्यात आले. या प्रकाराकडे महापालिका प्रशासन तसेच पाटबंधारे विभागानेही सोयीस्कर दूर्लक्ष केले आहे. शहरात अनेक ठिकाणी पूररेषेच्या आत झोपडपटटया तसेच बांधकामे झालेली आहे. अशीच स्थिती नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतही आहे. या ठिकाणी नदीपात्रात तसेच नदीला जोडणाऱ्या नाल्यांमध्ये राडारोडयाचे भराव टाकून इमारती बांधल्या आहेत.
पूररेषेचा खेळखंडोबा
शहरातून वाहनारी मुठा नदीची पूररेषा कागदावरच असून महापालिकेकडे असलेल्या पूर रेषा आणि पाटबंधारे विभागाकडे असलेल्या पूर रेषा चक्क भिन्न आहेत. या रेषांच्या आधारेच महापालिकेने नदीकाठच्या परिसरात बेसुमार बांधकामांना परवानगी दिली आहे. तर आता या रेषेचे महत्त्व राष्ट्रीय हरीत लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेचे तसेच पाटबंधारे विभागाचे कान टोचल्यानंतर महापालिका आणि पाटबंधारे विभाग पुन्हा जागा झाला असून आता नव्याने पूर रेषा निश्चित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामुळे नदीची वहन क्षमता मोठया प्रमाणात घटली आहे. परिणामी खडकवासला धरणातून अवघा 45 हजार क्यूसेक्स विसर्गा नंतरही शहरात पाणी घुसते, ही अतिक्रणे तातडीने काढण्याची गरज आहे. अन्यथा शहरला भविष्यात मोठया संकटाचा सामना करावा लागेल. त्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाने वेळीच जागे होण्याची गरज आहे. - सारंग यादवाडकर (पर्यावरणतज्ज्ञ)