भोरच्या बाजारावर नोटाबंदीचा परिणाम
By Admin | Updated: November 16, 2016 03:04 IST2016-11-16T03:04:20+5:302016-11-16T03:04:20+5:30
पाचशे व हजारच्या नोटाबंदचा परिणाम मंगळवारच्या भोरच्या आठवडेबाजारावर दिसून आला. बाजारात ग्राहक कमी झाल्याने बाजारावर

भोरच्या बाजारावर नोटाबंदीचा परिणाम
भोर : पाचशे व हजारच्या नोटाबंदचा परिणाम मंगळवारच्या भोरच्या आठवडेबाजारावर दिसून आला. बाजारात ग्राहक कमी झाल्याने बाजारावर ५० टक्के मंदीचे सावट दिसून आले. त्यामुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना आपला माल परत घरी घेऊन जावे लागले.
भोर शहरात दर मंगळवारी आठवडेबाजार भरतो. या बाजाराला शिरवळ, लोणंद, सासवड, फलटण, महाड व भोर तालुक्यातील विविध गावांतून भाजीपाला, कडधान्य, फळे, कपडे, चप्पल, खाऊ, मासे, बोंबिल अशा विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणारे सुमारे ४०० ते ४५० लहान मोठे व्यापारी येतात.
खरेदीसाठी भोर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी खरेदीसाठी येतात. साधारणपणे ८० ते ९० लाखांची उलाढाल दर मंगळवारी या बाजारात होते. यामुळे अनेकांचे संसार चालतात. मात्र, नोटा बदलून मिळत नसल्याने सदरची उलाढाल ५० टक्क्यांवर आली आहे.
बाजारात १०, २०, ५०, १०० रु. नोटांचे सुटे पैैसे मिळत नाहीत. त्यामुळे अनेक जण बाजाराला येऊनही त्यांना बाजार न करताच परत जावे लागले. व्यापाऱ्यांचा ६० टक्के माल विकला गेला नाही. पालेभाज्या व इतर बाजार खराब होत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
बाजार संपत आला, तरी २० टक्के माल खपला नाही. सदरचा माल पुन्हा गावाला घेऊन जावा
लागणार असल्याने जाणे-येण्याचा खर्च व दिवभर बसण्याचा
रोजही निघाला नाही, असे पुरंदर तालुक्यातून आलेले फळ व्यापारी इरफान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
अनेकांना माल उधार दिलेला आहे. आणलेला मालही खपला नाही. त्यामुळे पुन्हा गावाला परत घेऊन जाण्याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे उधारीवरही माल विकला असल्याचे सासवडचे भाजी व्यापारी विजय ढेरे, हर्णसचे विलास भिकाजी हिरगुडे यांनी सांगितले.
बँकेतही सुटे मिळत नसल्याने दर मंगळवारी भाजीपाला इतर बाजार खरेदी करण्यासाठी पैसे आणायचे कुठून, असे गृहिणी वर्षा शिंदे व सुशीला खुटवड यांनी सांगितले. (वार्ताहर)