शहरात पाणीकपात नाही!
By Admin | Updated: January 9, 2015 00:40 IST2015-01-09T00:40:55+5:302015-01-09T00:40:55+5:30
शहराला येत्या ७ महिन्यांसाठी ९ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

शहरात पाणीकपात नाही!
पुणे : शहराला येत्या ७ महिन्यांसाठी ९ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. १५ जुलैपर्यंत शहराच्या तसेच शेतीच्याही पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. मुंढवा येथील प्रकल्पामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले सुमारे दोन टीएमसी पाणी शेतीसाठी उपलब्ध होणार असल्याने ही पाणीकपात टळली आहे.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर गिरीश बापट यांनी झालेल्या निर्णयांची माहिती दिली.
बापट म्हणाले, ‘‘धरणक्षेत्रामध्ये कमी पाऊस झाल्याने ७ ते ८ टक्के धरणसाठा कमी आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातून शेती, शहराला पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर, २३ ग्रामपंचायती यांना पाणीपुरवठा केला जातो. कमी पाणीसाठ्यामुळे पाणीवाटपाचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर जुलैपर्यंत २ टीएमसी पाण्यावर प्रक्रिया होऊन ते शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. ८ हजार हेक्टर शेतीसाठी हे पाणी मिळेल. कपात केली नसली तरी पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे.’’ (प्रतिनिधी)
सध्या उपलब्ध २०.६४ टीएमसी पाणीसाठ्यापैकी ८.९५ टीएमसी पाणी शहरासाठी दिले जाणार असून, उर्वरित पाणी शेतीसाठी दिले जाईल. शहराला रोज १२०० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे १५ जुलैपर्यंत सुरळीत पुरवठा केला जाणार आहे. सांडपाण्यावर शुद्धीकरण करणे, पर्यावरण विभागाने बंधनकारक केले आहे. त्यानुसार मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तातडीने मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बेबी कॅनॉलमधील ३० मोऱ्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. सध्या हे काम निविदा स्तरावर आहे, ते लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - गिरीश बापट, पालकमंत्री
४गेल्या तीन वर्षांत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आॅगस्टच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात चांगाला पाऊस झाल्यानंतरच पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेकडून यंदा १५ आॅगस्टपर्यंत पाणीसाठा राखीव ठेवावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती.
४तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी या नियोजनाबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे अनेकदा सांगितले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत पाणीसाठा १५ आॅगस्टपर्यंत राखीव ठेवण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, ३१ जुलै पर्यंत आहे तेवढेच पाणी पालिकेस देण्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतल्याने महापालिकेकडूनही या मागणीस झुकते माप देण्यात आले आहे. मात्र, मागील दोन वर्षाप्रमाणेच यंदाही पावसाने ओढ दिल्यास पाण्याचे संकट कायम राहण्याचे चित्र आहे.
मुळशी धरणातून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न
४मुळशी धरणाची क्षमता २२ टीएमसी इतकी आहे. या पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. त्यातून मुंबई व रेल्वेला वीजपुरवठा केला जातो. मुळशी धरणातील संपूर्ण पाणी वीजनिर्मितीसाठी तहहयात देण्याचा करार झाला आहे.
४दुष्काळाच्या परिस्थितीत एकदाच खास बाब म्हणून पुणे शहराला पाणी देण्यात आले. या धरणातून भविष्यात पुणे शहरासाठी पाणी मिळावे याकरिता टाटा कंपनीसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली.