मतदानाची रंगीत तालीम नाहीच
By Admin | Updated: July 13, 2016 00:55 IST2016-07-13T00:55:13+5:302016-07-13T00:55:13+5:30
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानासाठी किती वेळ लागेल, केंद्र वाढवावी लागतील किंवा नाही याचा अंदाज घेण्यास महापालिकेच्या निवडणूक शाखेने अद्याप सुरुवात केलेली नाही.

मतदानाची रंगीत तालीम नाहीच
पुणे : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानासाठी किती वेळ लागेल, केंद्र वाढवावी लागतील किंवा नाही याचा अंदाज घेण्यास महापालिकेच्या निवडणूक शाखेने अद्याप सुरुवात केलेली नाही.
पालिकेची या वेळची सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे होणार आहे. त्यामुळे एका मतदाराला चार मतं द्यावी लागणार आहेत. त्यातून मतदान प्रक्रियेस नेहमीपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता गृहीत धरून आयोगाने महापालिकेला त्याची रंगीत तालीम घेऊन एकूण मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागेल किंवा कसे याचा अहवाल देण्यास सांगितले आहे. पालिकेकडून अद्याप असा अंदाज घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली दिसत नाही.
पालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, की एका मतदान केंद्रावर किमान ७०० व कमाल ९०० मतदार असतात. सकाळी ८ ते सायंकाळी ५ ही मतदानाची वेळ असते.
इतक्या वेळात या मतदारांचे मतदान पूर्ण होणार आहे किंवा नाही, हे काही मतदारांना प्रत्यक्ष मतदान करायला लावून पाहिले जाईल. त्यानंतरच मतदान केंद्र वाढवावी किंवा नाही याचा अंदाज येईल. अद्याप हे काम सुरू केलेले नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)